पावसाअभावी भातशेती संकटात; उत्पादन घटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:00 AM2018-09-19T02:00:34+5:302018-09-19T02:00:58+5:30
शेतकरीवर्ग धास्तावला, अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव
डिंभे : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. भातउत्पादक क्षेत्र असणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पंचमीपासून पावसाने काढता पाय घेतल्याने भातशेती संकटात सापडली आहे.
पावसाच्या अभावाबरोबरच अनेक ठिकाणी भातपिकाला रोगाची लागण झाल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. भातपीकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होवू लागला आहे. अनेक ठिकाणी भात शिवार पिवळी पडू लागली आहेत.
जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, पुरंदर या तालुक्यांत सुमारे ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. जून-जुलैत चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी जोमाने भातपिकाची लागवण केली. लागवड केलेले भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. आॅक्टोबर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्र तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम जातीच्या भातशेतीचा सुगंध परिसरात दरवळत असतो.
३ आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने भातखाचरामधील पाणी हळूहळू आटून गेले. सर्वत्र भात खाचरे कोरडी पडल्याचे चित्र दिसत आहे. खाचरांत पाणीच नसल्याने सध्या लागवड केलेल्या भातशेतीचे शेंडे पिवळे पडू लागले आहेत. काही ठिकाणी भातशेतीला करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. भातशेती चांगली पिकणार, ही आशा बाळगून असलेल्या शेतकरीवर्गाच्या मनात अपुरा पाऊस आणि करपा रागाची झालेली लागण यामुळे चिंतेचे ढग जमा झाले आहेत.
आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागातील पाटण, आहुपे व भीमाशंकर खोºयात जवळपास ८० टक्के शेतकरी गरव्या जातीची भातशेती करत असल्याचे पाहावयास मिळते. मात्र या तालुक्यात ३ आठवड्यापासून पाऊस गायब आहे. यामुळे भातशेती अडचणीत सापडली आहे. फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली या भागातील भातशेती पिवळी पडू लागली आहे.
अनेक तालुक्यांतील भातपिकांना फटका
पेरणीच्या वेळेस योग्य वेळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची भात रोपे लावडीसाठी योग्य वेळी तयार झाली होती. पावसाचा अंदाज येताच शेतकºयांनी धूळवाफेवर पेरण्या केल्या होत्या. पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागल्याचे बोलले जात होते. पुढे पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे भात लगावडीसाठी कोठेही खोळंबा वा विलंब झाला नाही. लागवड वेळेत उरकल्याने भातउत्पादक शेतकºयांच्या चेहºयावर समाधान होते. मात्र हे पीक ऐन भरात असतानाच जुन्नर, आंबेगांव, खेड तालुक्यासह सर्वत्रच पावसाने काढता पाय घेतला.