पालकांवरही संस्कार गरजेचे : डॉ. भास्कर गिरधारी; पुण्यात रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:32 PM2018-01-20T12:32:47+5:302018-01-20T12:36:29+5:30
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले.
पुणे : कुटुंबातील संवादाची जागा आता संघर्षाने घेतली आहे. समाजजीवनातील ही परिस्थिती चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांवर संस्कार होण्याबरोबर पालकांवरही संस्कार होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर गिरधारी यांनी व्यक्त केले.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले. या वेळी लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुद्रक-प्रकाशक आनंद लाटकर यांच्या उपस्थितीत पत्रकार भवनच्या सभागृहात स्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आनंद लाटकर म्हणाले, ‘संस्कार घडण्याची गरज काल होती, आज आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे संस्कारधन कायम उपयोगी आहे. ‘जगणं एका गुरुजीचं’ हे आत्मकथन वास्तवदर्शी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश प्राप्त केलेल्या व्यक्तीचे आहे.’
सुरेश कोते म्हणाले, ‘शिक्षणामुळे विद्या मिळते आणि त्यासाठी पैैसा लागतो. व्यवसाय उद्योगातूनही पैैसा मिळतो हे खरे असले तरी संस्कारातून, संस्काराबरोबर जीवनसमृद्धीचा मार्ग मिळतो.
रंगला सप्तसुरांचा कार्यक्रम
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायिका चारुशीला बेलसरे यांनी ‘सप्तसूर रंगले’ या कार्यक्रमात संस्कारधन पुस्तकातील ओव्या, अभंग, श्लोक, स्तोत्रे, भूपाळी आणि संग्रहित गीतरचनांचे गायन केले.