अचानक विमानाच्या वेळेत बदल करणा-या जेट एअरवेजला ग्राहक मंचाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 04:56 PM2018-12-21T16:56:18+5:302018-12-21T16:59:57+5:30
येत्या ४५ दिवसांत ग्राहकाला तिकीटाचे व नुकसान भरपाई म्हणून ३५ हजार १९० रुपये परत करावे, असे आदेश ग्राहक मंचाने दिले आहे.
पुणे : तिकीट बुक झालेल्या विमानाची वेळ अचानक बदलल्याने तिकीटाची रक्कम परत देण्यास मनाई करणा-या जेट एअरवेजला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. येत्या ४५ दिवसांत ग्राहकाला तिकीटाचे व नुकसान भरपाई म्हणून ३५ हजार १९० रुपये परत करावे, असे आदेश मंचाने दिले आहे. मंचाचे सदस्य अनिल जावळेकर आणि एस. जी. दुनाखे यांनी हा निकाल दिला.
या प्रकरणात नऊतेज सिंह (चेतना अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट) यांनी जेट एअरवेज विरोधात ग्राहक मंचात तक्रार दिली होती. तक्रारदार हे कायम पुणे ते श्रीनगर असा प्रवास करीत. त्यासाठी ते पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर अशा दोन टप्प्यात विमानाने जात. त्यांनी २७ फेब्रुवारी २०१६ रोजी १५ जुन २०१६ ला सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीला निघणारे जेट एअरवेजच्या विमानाचे तिकीट बुक केले होते. तक्रारदार नेहमीचे ग्राहक असल्याने कंपनीने त्यांना १८ हजार २२५ रुपयांचे तिकीट सवलत देवून १४ हजार २४९ रुपयांत बूक केले. दोन वेळा तिकीट कन्फॉर्म झाल्यानंतरही अचानक त्यांना विमानाची वेळी बदलण्यात आल्याचे सांगितले. ७ वाजून ३५ मिनिटांनी निघणारे विमान आता ५ वाजून ३० मिनिटांनी निघेले असे जेट एअरवेजकडून सांगण्यात आले. मात्र वयोव-द्ध असल्याने बदललेल्या वेळेत जाणे शक्य होणार नाही, असे त्यांनी जेट एअरवेज कळले. मात्र त्यांचा सकारात्मक प्रतिसाद न आल्याने त्यांनी दुस-या कंपनीचे तिकीट बुक के ले व बुक केलेल्या तिकीटीचे पैसे परत करण्याची जेट एअरवेजकडे मागणी केली होती.
दरम्यान जेट एअरवेजकडून त्यांना कळविण्यात आले की, तुम्ही बुकींग केलेल्या वेळेनुसार म्हणजे ७ वाजून ३५ मिनिटांनीच निघणार आहे. पण त्यापुर्वीच तक्रारदार यांनी दुसरे तिकीट बुक केले होते. वेळोवेळी रिफंटची मागणी करूनही पैसे न मिळाल्याने तक्रारदारांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तिकीटीचे १० हजार १९० रुपये आणि नुकसान भरपाई व व्याज मिळून ६० हजार १९० रुपये मिळण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने जेट एअरवेजसा आदेश दिले की, ९ टक्के व्याजासहीत तिकीटाच्या रक्कमेचे १० हजार १९० रुपये, २० हजार रुपये नुकसान भरपाई, ५ हजार रुपये तक्रारखर्च निकालापासून ४५ दिवसांत तक्रारदारांना परत करावे.