चुरस वाढूनही शिरूरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 01:15 PM2019-04-30T13:15:33+5:302019-04-30T13:16:30+5:30
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील व प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत असल्याने दिल्याने चुरस निर्माण झाली होती.
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांना राष्ट्रवादी प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हान दिल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, तरीही मतदानाचा टक्का काहीसा घसरलाच आहे. गेल्या वर्षीपेक्षा एक टक्का घटून ५८.४ टक्के मतदान झाले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव- पाटील आणि डॉ. कोल्हे यांची थेट लढत होत आहे. विजयी चौकार मारण्यासाठी आढळराव- पाटील यांनी जय्यत तयारी केली होती. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेले आणि शिवसेनेचे संपर्क नेते असलेले डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने त्यांना आव्हान दिले. त्याचबरोबर सहाही विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतील सुभेदारही सक्रीय झाले होते. आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि बड्या नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, त्याचे प्रत्यंतर मतदानात उमटलेले दिसले नाही .
आंबेगाव विधानसभा मतदारसंघ खासदार शिवाजीराव आढळराव यांचा घरचा मतदारसंघ. त्यांच्यातील माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्यातील संघर्षाचे मैदान असलेल्या आंबेगाव तालुक्यात सुमारे ६१ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत येथे ७२.०८ टक्के मतदान झाले हेते. तब्बल १२ टक्के मतदान घटले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा घरचा मतदारसंघ असलेल्या जुन्नरमध्येही हिच परिस्थिती आहे. येथे गेल्या निवडणुकीत ६७.५७ टक्के मतदान झाले होते. यंदाही ६७ टक्यांच्या आसपास मतदान झाले आहे. खेड- आळंदी मतदारसंघात ५९ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी येथे ६४.८९ टक्के मतदान झाले होते. शिरूरमध्येही गेल्या वेळीइतकेच सुमारे ६० टक्के मतदान झाले आहे.
भोसरी आणि हडपसर या शहरी विधानसभा मतदारसंघात ५४ टक्यांच्या आसपास मतदान झाले आहे. गेल्या वेळी भोसरीमध्ये ५२.७३ आणि हडपसरमध्ये ४८.५२ टक्के मतदान झाले होते.