पिफचा सोहळा ‘कपूर’मय!; रमेश सिप्पी, रमेश प्रसाद यांनी मांडला चित्रसृष्टीतील प्रवासाचा लेखाजोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:44 AM2018-01-12T11:44:16+5:302018-01-12T11:50:18+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ‘कपूर’मय झाला. रमेश सिप्पी आणि रमेश प्रसाद यांनी ओघवत्या वाणीने हिंदी चित्रसृष्टीतील प्रवासाचा लेखाजोखा मांडला.
पुणे : ‘नींद ना आए’, ‘तेरे मेरे बीच में’, ‘बस यही प्यार है’, ‘सागर किनारे’ अशा गाण्यांमधून एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांची ‘सुरेल’ जादू आणि कपूर कुटुंबाशी जोडलेल्या आठवणी... ‘हमनें बहोत प्यार से संभाला हुआ फिल्मों का खजाना आपके हवाले कर रहै है’ अशी रणधीर कपूर यांनी घातलेली आर्त साद... आरके स्टुडिओला लागलेल्या आगीच्या आठवणीने व्यथित झालेले ॠषी कपूर... ध्वनीचित्रफितीतून राज कपूर यांच्या आठवणींना मिळालेला उजाळा आणि उपस्थितांनी दिलेली दाद अशा भारावलेल्या वातावरणात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ‘कपूर’मय झाला. रमेश सिप्पी आणि रमेश प्रसाद यांनी ओघवत्या वाणीने हिंदी चित्रसृष्टीतील प्रवासाचा लेखाजोखा मांडला.
‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर, राजीव कपूर, ॠषी कपूर, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, सिटी प्राईड कोथरूडचे प्रकाश चाफळकर या वेळी उपस्थित होते. चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, प्रसाद स्टुडिओजचे प्रमुख रमेश प्रसाद यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी कपूर परिवाराने आरके प्रॉडक्शनच्या २३ चित्रपटांच्या निगेटिव्ह प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त केल्या.
रणधीर कपूर म्हणाले, ‘मी महाराष्ट्रात जन्मलो, वाढलो, तरी मला मराठी बोलता येत नाही. राज कपूर शरीराने मुंबईत असले तरी त्यांचे मन नेहमी पुण्यात असायचे. त्यांनी पुण्यावर मनापासून प्रेम केले. राज कपूर प्रॉडक्शनचा अमूल्य ठेवा आम्ही राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला सुपूर्त करत आहोत.’ पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी प्रास्ताविक केले. सुबोध भावे आणि आभा यांनी सूत्रसंचालन केले. रवी गुप्ता यांनी आभार मानले. उद्घाटन समारंभानंतर अॅलन ड्रल्जेविक दिग्दर्शित ‘मेन डोन्ड क्राय’ हा बोस्नियन भाषेतील चित्रपट दाखवून महोत्सवाला सुरुवात होईल.
माझ्या जीवनातील प्रेमरोग, प्रेमग्रंथ, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम यांसह अनेक चित्रपटाचे शूटिंग पुण्यात झाले आहे. त्यामुळे पुण्याशी एक वेगळंच नातं आहे. आरके स्टुडिओला आग लागल्यामुळे आम्ही मोलाचे साहित्य गमावले. स्टुडिओच्या चार भिंती परत उभ्या करता येतील. मात्र, हरवलेला ठेवा कुठून परत आणणार? राज कपूर यांच्या चित्रपटांच्या २३ निगेटिव्हच्या रुपाने आम्ही आमची संपत्ती योग्य हातांमध्ये सुपूर्त केली आहे.
- ऋषी कपूर
भारतीय चित्रपटसृष्टीचा एक भाग असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कपूर परिवाराशी पूर्वीपासून नाळ जोडली गेलेली आहे. चित्रसृष्टीत इतरांनी केलेले कामही प्रशंसनीय आहे. मी आजवरच्या प्रवासात जे काही शिकलो, ते पुढील पिढीकडे सुपूर्त करण्याचा प्रयत्न करत आहे. सिनेमा कसा आणि का बनतो, हे पुढील पिढ्यांनी जाणून घ्यावे.
- रमेश सिप्पी
माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य चित्रपटासाठी समर्पित केले. त्यांना सुरुवातीला हिंदी, इंग्रजी भाषा येत नव्हती. मात्र, चित्रपट हीच त्यांची पॅशन होती. त्यासाठी त्यांनी खूप संघर्ष करत लांबचा पल्ला गाठला. माझ्या कामातून मी वडिलांना मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहे.
- रमेश प्रसाद