'सैराट' होऊ नये म्हणून मुलीची आई वडिलांविरोधात याचिका दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 05:32 PM2019-05-07T17:32:19+5:302019-05-07T17:38:47+5:30
खोट्या प्रतिष्ठेचे कारण देत पोटच्या मुलीचा जीव घेणाऱ्या ऑनर किलिंगची घटना नुकतीच नगर जिल्ह्यात बघायला मिळाली. अशा पद्धतीचे कृत्य घडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका पोहचू नये म्हणून १९ वर्षीय मुलीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे
पुणे : खोट्या प्रतिष्ठेचे कारण देत पोटच्या मुलीचा जीव घेणाऱ्या ऑनर किलिंगची घटना नुकतीच नगर जिल्ह्यात बघायला मिळाली. अशा पद्धतीचे कृत्य घडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका पोहचू नये म्हणून १९ वर्षीय मुलीने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात तिने आई, वडील आणि काका यांच्या विरोधात दाद मागितली आहे.
प्रियांका शेटे असे या मुलीचे नाव असून ती तळेगाव दाभाडे येथे कायद्याचे शिक्षण घेते. प्रियांकाचे तिच्याच वयाच्या मात्र दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम असून भविष्यात ते लग्न करू इच्छितात. मात्र मुलाचे वय २१ वर्ष नसल्याने त्यांना लग्नासाठी अजून दोन वर्ष थांबावे लागणार आहे. दरम्यानच्या काळात तिच्या घरच्यांना या बाबतची कल्पना आल्याने त्यांनी तिला विरोध केला आहे. यापूर्वी तिने याच कारणामुळे आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे. याच संदर्भात तिने भारतीय राज्यघटनेतील २१व्या कलमानुसार उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्यात तिने आई योगिता संतोष शेटे (वय ३५), वडील संतोष बंडू शेटे (वय ४२ ) आणि काका दत्तात्रय बंडू शेटे (वय ४५) यांच्या विरोधात याचिका केली आहे. त्यानुसार तिला न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी दोन आठवडयांनी सुनावणी होणार आहे.
फिर्यादी प्रियांका शेटे म्हणाल्या की, 'माझे आई वडील आणि काकांचा आमच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे माझे शिक्षण बंद करून मला जबरदस्ती घरात बसवले. माझ्या काकांनी मला डोक्याला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली'. याबाबत फिर्यादीचे वकील ऍड नितीन सातपुते म्हणाले की, 'सदर प्रकरणात न्यायालयाने फिर्यादीची बाजू ऐकली असून तिला तात्पुरत्या स्वरूपात पोलीस संरक्षणाचे आदेश दिले आहेत. याच विषयात फिर्यादीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केलं असता ती पोलिसांनी दाखल करून घेतलेली नाही. त्या संदर्भातही आम्ही न्यायालयात दाद मागणार असून पुढील सुनावणी येत्या २१मे रोजी होणार आहे.