पे पार्किंगविरोधात पालिकेत आंदोलने; विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:14 AM2018-03-24T04:14:09+5:302018-03-24T04:14:09+5:30
विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना यांनी एकत्र येऊन महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहरातील वाहतूक पार्किंग शुल्कआकारणी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. या वेळी सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या.
पुणे : विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना यांनी एकत्र येऊन महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहरातील वाहतूक पार्किंग शुल्कआकारणी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. या वेळी सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. सुरक्षारक्षकांनी दोन्ही प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे पालिकेसमोरच्या रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली.
स्थायी समितीने मंजूर केलेले वाहनतळ धोरण अंतिम मान्यतेसाठी शुक्रवारी तातडीने स्थायी समितीसमोर आणण्यात आले. रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचेच प्रत्यंतर पालिकेसमोरच्या आंदोलनात आले. संभाजी ब्रिगेड, पतित पावन, भीम छावा आदी संघटनांनी आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बैल जोडलेला मोठा गाडा घेऊन आले होते. काहींनी टांगा आणला होता. दोन्ही प्रवेशद्वारांवर गर्दी झाली होती. घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणला होता. पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी नागरिकांनाही आत जाण्यास मनाई केली. त्यांच्या उद्धट व आडमुठेपणाच्या वागण्यामुळे वाद सुरू झाला. त्याचा फटका आजी-माजी महापौरांनादेखील बसला. त्यांना काही काळ महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. सभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी भाजपाच्या निषेधाच्या घोषणा देत सभागृहात गोंधळ केला. मनसेचे वसंत मोरे, साईनाथ बाबर डोक्यावर खेळण्यातील वाहने बांधून आले होते.
शिवसेनेचे गटनेते संजय भोसले व अन्य सदस्य काळे शर्ट, टोप्या परिधान करून आले होते.