पीएमपी बस कोसळली २० फूट खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 04:57 AM2018-07-03T04:57:52+5:302018-07-03T04:58:02+5:30

मुंबई-पुणे महामार्गावरून वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली.

 PM collapses in a 20-foot pothole | पीएमपी बस कोसळली २० फूट खड्ड्यात

पीएमपी बस कोसळली २० फूट खड्ड्यात

googlenewsNext

कर्वेनगर/पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरून वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन-तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘पीएमपी’च्या ताफ्यात ठेकेदारांमार्फत भाडेतत्त्वावर सुमारे ६५३ बस चालविल्या जातात. अपघातग्रस्त बस एका ठेकेदारामार्फत चालविली जाते. ही बस सकाळी कात्रज स्थानकातून निगडी डेपोच्या दिशेने (मार्ग क्र. ४३) निघाली होती. या बसवर प्रकाश खोपे (वय ४०) हे चालक व अरुण गिते (वय ३०) हे वाहक होते. अपघातप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : नेहमीप्रमाणे ही बस मुंबई-पुणे महामार्गाने कात्रज वरून वारजेच्या दिशेने निघाली होती. वारजे पुलाजवळ दोन भागांत रस्ता विभागला गेला आहे. यामध्ये महामार्गावरून वारजेकडे जाणाºया जोड रस्त्यावर ही बस वळण घेत असताना, चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस जोड रस्त्यालगत असलेल्या वीस फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली. या वेळी बसमध्ये ३२ प्रवासी होते.
अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांकडून बचावासाठी आरडाओरडा सुरू करण्यात आला. या मार्गावर वाहनांची सततची ये-जा असल्याने नागरिकांनी तातडीने मदत करण्यास सुरुवात केली. प्रवाशांना बसमधून बाहेर काढून जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. काही प्रवाशांना किरकोळ मार लागला असला, तरी ते घाबरून गेले होते. बस पडली त्या ठिकाणी रस्त्यावर काम करणाºया मजुरांची तात्पुरत्या स्वरूपाची पत्र्याची घरे होती. अपघात घडला त्या वेळी सर्व मजूर कामासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे ते सुदैवाने अपघातातून बचावले. दरम्यान, वाहकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात वाहक किरकोळ जखमी झाला आहे. आमदार भीमराव तापकीर यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली; तसेच वारजे स्मशानभूमीपासून वारजेपुलापर्यंत संरक्षक कठडे किंवा लोखंडी ग्रील लावण्याची सूचनाही त्यांनी केली.

२१ प्रवासी जखमी
अपघातावेळी बसमध्ये ३२ प्रवासी होते. त्यापैकी २१ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
बस पडली त्याठिकाणी एक नागरिक होता. तोही या अपघातात जखमी झाला आहे. सर्व जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
त्यापैकी १८ प्रवाशांना उपचारानंतर सायंकाळपर्यंत घरी सोडण्यात आले. सर्व प्रवाशांचा उपचाराचा खर्च ठेकेदाराकडून करण्यात आल्याची माहिती पीएमपीतील अधिकाºयांनी दिली.

स्टेअरिंग रॉडने केला घात
बस महामार्गावरून जोड रस्त्यावर वळण घेत असताना स्टेअरिंग रॉड निघाल्याचा प्राथमिक अंदाज पीएमपीतील अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. संबंधित बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या बसचे स्टेअरिंग जोरात वळविण्यात आल्याने ते तुटले. त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनीही हा अपघात बसची योग्य देखभाल-दुरुस्ती नसल्याने झाला असून, अद्याप अंतिम अहवाल मिळालेला नसल्याचे सांगितले.

Web Title:  PM collapses in a 20-foot pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे