पीएमपीचे मुख्य अभियंता सुनिल बुरसे बडतर्फ, तुकाराम मुंढे यांची कारवाई, कामातील निष्काळजीपणा भोवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 09:21 PM2017-11-20T21:21:48+5:302017-11-20T21:22:07+5:30
कामात निष्काळजीपणा करून कंपनीच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) मुख्य अभियंता सुनिल बुरसे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिका-याला सेवेतून मुक्त केल्याने पीएमपीत खळबळ उडाली आहे.
पुणे : कामात निष्काळजीपणा करून कंपनीच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) मुख्य अभियंता सुनिल बुरसे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिका-याला सेवेतून मुक्त केल्याने पीएमपीत खळबळ उडाली आहे.
पीएमपी ही कंपनी २००७ मध्ये अस्तित्वात आल्यापासून बुरसे हे मुख्य अभियंता म्हणून काम पाहत होते. केवळ मागील दोन-तीन वर्षांत काही काळासाठी इतर दोन अधिका-यांकडे या पदाचा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांपुर्वी बुरसे यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली होती. मुंढे यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सेवा सुधारण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांना सुरूवातीपासून चांगलेच फैलावर घेतले होते. त्यांनी कामात निष्काळजीपणा करणा-यांवर निलंबन किंवा दंडात्मक कारवाई केली जात होती. ही कारवाई सातत्याने सुरूच असते. त्यांनी काही महिन्यांपुर्वी बुरसे यांच्यासह काही अधिका-यांना अधिकाधिक बस मार्गावर आणण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. मात्र, मुंढे यांच्या अपेक्षेप्रमाणे बस मार्गावर आल्या नाहीत. जुन महिन्यात त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती.
सुमारे दहा वर्ष मुख्य अभियंता असताना अपेक्षित बस मार्गावर न आणणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, आवश्यक सुट्टे भाग उपलब्ध करूनही बस दुरूस्त न होणे तसेच त्यांच्या काळात बस मार्गावर न आल्याने कंपनीला आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका बुरसे यांच्यावर ठेवण्यात आले होता. या सर्व आरोपांची चौकशी करण्यात आली. हे आरोप सिध्द झाल्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मुंढे यांनी यापुर्वी काही कर्मचारी व कनिष्ठ अधिका-यांवर बडतर्फीची कारवाई केली होती. मात्र, पहिल्यांदाच एका वरिष्ठ अधिका-याला बडतर्फ केले आहे. त्यामुळे ह्यपीएमपीह्ण वर्तुळात खळबळ उडाली आहे. मागील दहा वर्षांतील पीएमपीच्या नुकसानीस जबाबदार असलेले आणखी काही अधिकारी सेवेत असून त्यांचीही अशी चौकशी करण्याची मागणी पीएमपी संघटनेच्या पदाधिका-यांनी केली आहे.
पाच कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान
सुनिल बुरसे हे मुख्य अभियंता असताना त्यांच्या अपेक्षित बस मार्गावर न आल्याने पीएमपीचे आर्थिक नुकसान नुकसान झाले आहे. मागील दहा वर्षांत सुमारे पाच कोटी १९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. अपेक्षित बस मार्गावर आल्या असत्या तर हे नुकसान टाळता आले असते. सध्या बुरसे यांना केवळ बडतर्फ करण्यात आले असले तरी नुकसानीची रक्कम त्यांच्याकडून वसुलही केली जावू शकते, अशी चर्चा अधिका-यांमध्ये आहे.
- सुनिले बुरसे यांनी सुमारे दहा वर्ष मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात ५० ते ५५ टक्के बसच मार्गावर होत्या. ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच वरिष्ठांचे आदेश न पाळणे, कंपनीला आर्थिक नुकसान यांसह आणखी काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. चौकशीमध्ये त्यात तथ्य आढळून आले. यावर नियमानुसार त्यांचेही म्हणणे जाणून घेण्यात आले. त्यांनतरच त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
पीएमपी