घुसखोरांवर ‘पीएमपी’ची कारवाई; २५ वाहनांवर दंडात्मक तर ५ वाहनांवर जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:21 AM2018-01-07T03:21:32+5:302018-01-07T03:21:47+5:30
बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. शुक्रवारी येरवडा ते वाघोली या मार्गावर रात्री २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
पुणे : बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. शुक्रवारी येरवडा ते वाघोली या मार्गावर रात्री २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ५ वाहने जप्तही करण्यात आली आहेत. सोमवारपासून सर्व बीआरटी मार्गांवर घुसखोरी करणारी खासगी तसेच शासकीय वाहनांवरही थेट जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती ‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली.
प्रवाशांना जलद, सुलभ व सुरक्षित सार्वजनिक बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतून बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले आहेत. या मार्गावर बसेससह केवळ रुग्णावाहिकांची ये-जा अपेक्षित आहे. मात्र, या मार्गांवर खासगी वाहनेही सर्रासपणे घुसखोरी करतात. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. पीएमपीने ही घुसखोरी रोखण्यासाठी वॉर्डनचीही नियुक्ती केली. त्यांना न जुमानता तसेच शिवीगाळ, धक्काबुक्की करून वाहने मार्गावरून नेली जातात. याची गंभीरपणे दखल घेत मुंढे यांनी घुसखोरी करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतुक पोलिसांच्या मदतीने संबंधित वाहनांवर दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई करण्याचे त्यांनी काही दिवसांपुर्वीच स्पष्ट केले होते. यापार्श्वभुमीवर शुक्रवारपासून कारवाईला सुरूवात करण्यात आली.
याविषयी माहिती देताना मुंढे म्हणाले, येरवडा ते वाघोली या मार्गावर शुक्रवारी रात्री ८ ते ९.४५ या वेळेत घुसखोरी करणाºया वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत २० दुचाकी व ५ चारचाकी अशा एकूण २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २ चारचाकी वाहने शासकीय आहेत. तसेच पाच वाहने जप्तही करण्यात आली. तसेच सोमवारपासून प्रत्येक बीआरटी मार्गावर कठोरपणे कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार खासगी वाहनांसह शासकीय वाहनांवरही जप्तीची कारवाई केली जाणार आहे. जप्त वाहनांचा नंतर लिलाव केला जाईल.
नवीन दापोडी व निगडी बीआरटी मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. बसेसची चाचणीही घेण्यात आली असून काही त्रुटी दूर केल्या जात आहेत. सुरक्षिततेबाबत तडजोड न करता आणखी काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील.
याबाबत पालिका प्रशासनासोबत समन्वय साधला जात आहे. मार्ग तयार झाल्यानंतर बससेवा सुरू केली जाईल, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी या मार्गाला विरोध केला आहे.