फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 05:51 PM2019-05-15T17:51:53+5:302019-05-15T17:54:54+5:30
काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.
पुणे :काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील नदीपात्रात असलेल्या चौपाटीमध्ये शंतनू संजय सुर्वे हा तरुण रात्री साडेबाराच्या दरम्यान मित्रांसोबत खाण्यासाठी आला होता. शंतनूचे शिक्षण अभियांत्रिकीपर्यंत झाले आहे. रविवारी रात्री त्यांचे खाणे सुरु असताना पेट्रोलिंग करत असलेले काही पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी दुचाकींच्या हवा सोडण्यास सुरुवात केली. यात शंतनूच्या दुचाकीचाही समावेश होता. त्यामुळे त्याने पोलिसांना हवा का सोडली असे विचारले. मात्र त्यावर काहीही उत्तर न मिळाल्याने त्याने आता पाच किलोमीटर बुलेट घेऊ मी कसा जाऊ असा प्रश्न विचारला.
त्यावर चिडलेल्या पोलिसांनी त्याला मारहाण केली. यात त्याला दुखापत झाली असून अंगावर मारण्याचे व्रण स्पष्ट दिसत आहे. याबाबत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे स्वप्नीलने लोकमतशी बोलताना सांगितले आहे. तो म्हणाला की, विनायक भांगे या पोलिसाने अधिक मारहाण केली असून ते साध्या वेशात होते. गुन्हेगारांवर अंकुश आणि सामान्यांना मदत करणाऱ्या पुणे पोलिसांच्या या उलट वर्तनाबद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाली असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.