पाणी नसल्याने पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 12:00 PM2018-10-14T12:00:19+5:302018-10-14T12:00:49+5:30
शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला.
पुणे - शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले आहे़ काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला होता़ टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़.
खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत़ शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासून अपुरा पाणीपुरवठा होत होता़ त्यात गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी टाकीतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़.
शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये तर अत्यंत कमी दाबाने गेल्या ४ दिवसांपासून पाणी येत आहे़ अनेक इमारतीमध्ये तर पाणीच आले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कुटुंब रविवारी सकाळी रस्त्यावर आले़ महिलांनी पुढाकार घेऊन वसाहतीबाहेरील रस्त्यावर बादल्या, हंड्यांसह ठाण मांडले आहे़.
दुसरीकडे काही महिला व पुरुष यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला़ त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ त्यानंतर गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरविले जाईल असे आश्वासन दिले़ त्यानंतर महिला व इतर नागरिक घरी गेले. शिवाजीनगर पोलीस लाईनला आज सकाळी अडीच तास पाणी पुरवठा केला होता़ पण, तो कमी दाबाने झाल्याने अनेक ठिकाणी पाणी पोहचले नाही़ त्यामुळे आता तेथे ३ टँकर पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.