खाकीवर डाग ! पुण्यात पोलीस कर्मचा-यानं बनवला विवाहितेचा अश्लील व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 11:40 AM2017-09-26T11:40:53+5:302017-09-26T13:13:07+5:30
पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आंघोळ करणाऱ्या एका विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे - पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आंघोळ करणाऱ्या एका विवाहित महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे घाणेरडं कृत्य करताना त्यानं तीन साथीदारांना सोबत घेऊन पीडित महिलेच्या पतीला अडवून दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्याला अटक केली असून त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत.
ही घटना सोमवारी (25 सप्टेंबर) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चतुःश्रृंही परिसरात घडली आहे.
समीर पटेल असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. समीर पटेलविरोधात 30 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. आपला अश्लील व्हिडीओ बनवण्यात आल्याचे पीडितेला समजताच तिनं तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली व तक्रार नोंदवली. पोलिसांनीदेखील महिलेच्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी औंध पोलीस लाईन येथे राहतो व तो खडक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याच्या शेजारी फिर्यादीचे घर आहे. पीडित महिला बाथरूममध्ये आंघोळ करत असताना शेजारी राहणारा पोलीस शिपाई समीरनं फिर्यादीचे अर्धनग्न अवस्थेचे मोबाइलमध्ये शुटींग केले. पीडित महिलेच्या पतीला ही बाब समजताच तो जाब विचारायला गेला असता आरोपीची पत्नी, भाऊ आणि सासूने महिलेच्या पतीला दमदाटी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी आरोपीसहीत त्याची पत्नी, भाऊ व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.