पोलिसाला दीड कि.मी. नेले फरफटत, धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:51 AM2018-01-30T03:51:25+5:302018-01-30T03:51:35+5:30
फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर मोटार घातली़ ते बोनेटवर पडले असताना त्या अवस्थेत त्यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर मोटार घातली़ ते बोनेटवर पडले असताना त्या अवस्थेत त्यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दीपक सोनी हा शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चतु:शृंगी पायथ्याजवळ येणार असल्याची माहिती खरात यांना मिळाली. त्यानुसार ते वरिष्ठांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी गेले. चतु:शृंगी पायथ्याजवळ अनगळ पार्कसमोर सोनी हा मोटारीमध्ये बसल्याचे त्यांना दिसले. खरात आणि त्यांचे सहकारी त्याच्याकडे चौकशीसाठी गेले. त्याला गाडीची काच खाली करायला लावून, ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगितले. याच वेळी सोनीने त्याची मोटार सुरू करून थेट खरात यांच्या अंगावर घातली; त्यामुळे ते बोनेटवर आदळले. त्यानंतरही सोनी हा न थांबता तशीच जोरात मोटार पुढे घेऊन जात होता़ खरात यांनी आरडाओरडा करून थांबविण्यास सांगितले. तरीही त्याने त्यांच्या जिवाची पर्वा न करता मोटार तशीच पुढे नेली. हा सर्व प्रकार बघून रस्त्यावरील नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला. सोनी याने खरात यांना सुमारे १० मिनिटे दीड किलोमीटर फरफटत नेले. त्यामुळे त्यांच्या हाताला, पायाला गंभीर जखमा झाल्या. पाषाण रस्त्याला नेल्यानंतर त्याने खरात यांना बोनेटवरून खाली पडले़ त्यानंतर तो तेथून पळून गेला. खरात यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनी आणि त्याच्या साथीदाराला अद्याप अटक केलेली नाही.