आंबडखिंडीत दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 11:27 PM2017-09-17T23:27:28+5:302017-09-17T23:28:36+5:30
भोर-मांढरदेवी मार्गावरील आंबडखिंड (ता. भोर) घाटात रविवारी सकाळी ५.३० च्या दरम्यान कणीची ओहळ येथे मोठी दरड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
नेरे : भोर-मांढरदेवी मार्गावरील आंबडखिंड (ता. भोर) घाटात रविवारी सकाळी ५.३० च्या दरम्यान कणीची ओहळ येथे मोठी दरड कोसळल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. भोर-मांढरदेवी मार्गावरून आंबड खिंड घाटातून वाई, महाबळेश्वर, पाचगणीला जाणाºया पर्यटकांची मोठी संख्या आहे.
या घाटात रविवारी सकाळी साडेपाचच्या दरम्यान आंबाडे येथील ट्रेकिंगला जाणा-या तरुणांना मोठा आवाज आला. या तरुणांनी घाटातून फेरफटका मारून पाहिले असता त्यांना दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत घाटातून प्रवास करणा-या वाहनांना थांबवून या घटनेची माहिती दिली. तसेच, कोसळलेल्या दगडींच्या ढिगा-याखाली कोणी सापडून अपघात झाला आहे काय, याचीही त्यांनी पाहणी केली. याच तरुणांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला घटनेची त्वरित माहिती दिली.
>तीन किलोमीटर पायी प्रवास
एका तासानंतर भोर-मांढरदेवी एसटी बसचे चालक विजय खोपडे, वाहक दयानंद बोगाळे, मनोज खोपडे आणि मुंबई येथील पुरुष प्रवाशांनी जीव धोक्यात घालून कोसळलेल्या दरडी काही वेळातच बाजूला करून दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू केली. एसटी बस घाटात अडकल्याने प्रवाशांना मात्र तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागला. दोन तासांनंतर साप्ताहिक सुट्टी असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी बाळू भेलके, शरद रांजणे जेसीबी घेऊन घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील राडारोडा बाजूला करून मार्ग मोकळा केला.