खासगी रुग्णालयांची होणार नोंद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:23 AM2017-09-05T00:23:44+5:302017-09-05T00:24:04+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व खासगी रुग्णालये व दवाखाने यांची आता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दप्तरी नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने आता संबंधितांना नोंदणी करावी लागणार आहे.
देहूरोड, दि. 5 - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व खासगी रुग्णालये व दवाखाने यांची आता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या दप्तरी नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने आता संबंधितांना नोंदणी करावी लागणार आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत खासगी जागांवर मोबाइल टॉवर उभारण्यासाठी व जाहिरात फलकांबाबत धोरण निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली असून, अनधिकृतपणे उभारणी केल्यास काढून टाकण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, लष्करी सदस्य कर्नल राजीव लोध, सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारिमुत्तू, गोपाळ तंतरपाळे, अॅड. अरुणा पिंजण, कार्यालय अधीक्षक श्रीरंग उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या नवीन इमारतीबाबत तीन वास्तुविशारद संस्थांनी सादरीकरण केले. उपाध्यक्ष खंडेलवाल व सदस्य शेलार यांनी वाढते नागरीकरण, तसेच द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गजवळ असल्याने रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पन्नासऐवजी शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याची सूचना मांडली. कॅन्टोन्मेंटच्या ताफ्यातील सहा जुनी वाहने आर्थिकदृष्ट्या दुरुस्ती करणे योग्य नसल्याने ती बाद करुन सात नवी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता नव्वद लाखांहून अधिक खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. बोर्डाच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञांची संबंधित रुग्णाच्या बिलाच्या ६०:४० तत्त्वावर नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.
बोर्डाकडून मराठी दैनिकांत मराठी भाषेत जाहिराती, निवेदने व सूचना प्रसिद्ध करण्यात येत असल्याचा मुद्दा सदस्य शेलार यांनी उपस्थित करून नागरिकांकडून मागणी होत असताना दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आणले.
अध्यक्ष वैष्णव यांनी यापुढे मराठीत जाहिराती देण्याबाबत निर्देश दिले आहेत. शाळा, स्मशानभूमीसह विविध मिळकतींसाठी ५६ सुरक्षारक्षक पुरवठा करण्याच्या दरमहा १६ लाख ३६ हजार ७६७ रुपये खर्चाच्या निविदेस मान्यता देण्यात आली.
देहूरोड पोलिसांना सण-उत्सवाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वाहनांची अडचण असल्याने अधीक्षक सुवेझ हक यांनी मागणी केल्यानुसार एक वाहन देण्याबाबत उपाध्यक्ष खंडेलवाल यांनी सूचना मांडली असता, पोलीस अतिक्रमण हटविण्याबाबत आवश्यक सहकार्य करीत नसल्याचे सांगितले. अध्यक्ष वैष्णव यांनी फक्त तातडीच्या वेळी वाहन उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
समाजमंदिर : लिलाव प्रक्रियेस विरोधदेहूरोड -विकासनगर रस्त्यावरील स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेले समाजमंदिर मूळ उद्देश डावलून प्रशासनाकडून व्यावसायिक वापरास देण्याबाबत लिलाव प्रक्रिया झाली असून सदस्य तंतरपाळे यांनी त्यास विरोध दर्शविला. याबाबत पुढील बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. अनधिकृत मोबाईल टॉवर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हद्दीतील जुन्या मोबाईल टॉवरबाबत काय करणार याबाबत सारिका नाईकनवरे यांनी प्रश्न उपस्थित केला असता काढून टाकावा लागणार असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले.