पुणे : निधी अभावी इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं अधिवेशन रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 09:34 AM2018-12-13T09:34:16+5:302018-12-13T09:34:45+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद रद्द करण्यात आली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली "इंडियन हिस्टरी काँग्रेस" ही परिषद रद्द करण्यात आली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता असल्याने ती पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागाने शासनाला पाठविले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन करण्यात आलेली ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ ही शैक्षणिक आणि व्यावसायिक इतिहास अभ्यासकांची संस्था आहे. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाने १९३५ मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर ही परिषद पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयोजित करण्यात येणार होती. या परिषदेत देशभरातून सुमारे ३ हजार इतिहास अभ्यासक उपस्थित राहणार होते.
इंडियन हिस्टरी काँग्रेस ही आधुनिक भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण परिषद आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आले असले तरी या परिषदेत सरकारच्या विरोधात तीव्र सूर उमटण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाकडून हे पाऊल उचलण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.