एसटी कर्मचा-यांचा संप : पुण्यातून एकही बस सुटली नाही, खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची होतेय लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 10:53 AM2017-10-17T10:53:55+5:302017-10-17T17:59:38+5:30
एसटी कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.
पुणे - एसटी कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पुण्यातही सकाळपासून एकही एसटी बस संपामुळे सुटू शकलेली नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून सातवा वेतन आयोग लागू करावा व इतर विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी कर्मचारी पाठपुरावा करत होते परंतु राज्य सरकारने कुठलीही दखल न घेतल्यामुळे,परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर राज्यभर संप करण्याचा निर्णय घेतला व या संपाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिला. मात्र ऐन दिवाळीच्या सणात प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीची सुट्टी सुरू झाल्यामुळे स्वारगेट बसस्थानकात प्रवाशांची नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती. परंतु संप सुरू असल्यामुळे एकही एसटी बस थांब्यावर उभी नव्हती. त्यामुळे काही प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
याचा फायदा खासगी वाहतुकदारांनी घेऊन प्रवाशांची लुट सुरू केली आहे. काही प्रवासी नाईलाजास्तव खाजगी वाहतूक सेवा वापरत होते. काही प्रवासी लहान मुलांना घेऊन देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. परंतु मध्यरात्री सुरू झालेल्या संपाची कुठलीही माहीती नसल्यामुळे त्यांना परत आपल्या घराची वाट धरावी लागली. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रवाशांची विचारपूस करत, राज्य परिवहन मंडळीच्या कर्मचाऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. यानंतरसुप्रिया सुळे पुढील दौऱ्यासाठी कोल्हापूरला जाणार होत्या. यावेळी त्यांनी तीन जेष्ठ प्रवाशांना आपल्या गाडीतून कोल्हापूर येथे सोडले.