सौरऊर्जेने उजळणार पुणे स्टेशन
By admin | Published: December 9, 2015 12:26 AM2015-12-09T00:26:50+5:302015-12-09T00:26:50+5:30
विजेची बचत करण्यासाठी देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा पॅनल तसेच पवनचक्की उभारण्यात येणार आहे.
पुणे : विजेची बचत करण्यासाठी देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा पॅनल तसेच पवनचक्की उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून निर्माण होणारी वीज वापरून रेल्वेकडून विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत केली जाणार आहे. याबाबतचे आदेश केंद्रीय रेल्वे प्रशासनाने दिले असून त्यानुसार, पुणे रेल्वे स्थानक प्रशासनाकडून या कामाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
देशभरात विस्तारलेल्या रेल्वेचे १६ झोन असून ६६ विभाग आहेत, तर सुमारे साडेसात हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीजवापर केला जातो. तसेच यासाठी डिझेल आणि कोळसा वापरला गेल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणही होते.
यामुळे वाढता वीजवापर कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व प्रमुख जंक्शनच्या ठिकाणी सौरऊर्जा पॅनलचा वापरून त्या ठिकाणी निर्माण होणारी वीज स्टेशनसाठी वापरण्यात येणार आहे.
पुणे स्टेशनवरही ही यंत्रणा उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी यंत्रणा उभारण्यासाठीची प्रशासकीय तयारी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे. हे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुणे रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे स्थानक असून येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे येथे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. आता सौरऊर्जेच्या वापरामुळे रेल्वे प्रशासनाच्या बिलात बचत होणार आहे. (प्रतिनिधी)