करोडाच्या आमिषाने डॉक्टरांनी केली १५ लाखांची फसवणूक : गुंतवणूकीसाठी घ्यायला लावले कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 05:12 PM2018-09-05T17:12:16+5:302018-09-05T17:12:20+5:30
मल्टी मार्केटिंगच्या माध्यमातून करोडो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका डॉक्टर व त्याच्या नातेवाईकांची १५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.
पुणे : मल्टी मार्केटिंगच्या माध्यमातून करोडो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका डॉक्टर व त्याच्या नातेवाईकांची १५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी डॉ़ अभिजित खके यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. अलंकार पोलिसांनी दोघा महिला डॉक्टरांसह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
हा प्रकार जुलै २०१७ ते १ सप्टेंबर २०१८ दरम्यान घडला़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ़ अभिजित खके हे डोळ्यांचे डॉक्टर आहेत़ डॉ़ खके यांची एका महिला डॉक्टरांबरोबर ओळख होती़ त्यांनी क्वेन्ट या मलेशियातील कंपनीच्या मल्टी मार्केटिंगचे काम आम्ही करीत असल्याचे सांगितले़ त्यांना भेटायला बोलविले़ हे त्यांना भेटायला गेले तेव्हा तिथे आणखी एक महिला डॉक्टर व व्यक्ती उपस्थित होते़ त्यांनी मलेशियाच्या या कंपनीचे हॉलीडे कॅपेज आहे़ त्यांचे प्रॉडक्टची विक्री झाली की, त्यातून मोठा फायदा होईल़ ३ ते ४ वर्षात ३ कोटी रुपये कमिशन मिळू शकेल़ आम्ही तिघे पार्टनर असून आमच्याकडे भांडवल कमी पडत आहे़ तुम्ही यात भांडवल टाकले तर तुम्हाला पार्टनर करु घेऊ, असे त्यांना आमिष दाखविले़ सुरुवातीला ३ लाख ५४ हजार रुपये भांडवल म्हणून व रजिस्टेशनसाठी ३३ हजार ५०० रुपये भरावे लागतील असे त्यांना सांगण्यात आले़.
त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला काही पैसे भरले़ त्यानंतर त्यांनी अधिक पैसे आपल्याकडे नसल्याचे सांगितल्यावर त्या तिघांनी गुप्ता नावाच्या एकाचे नाव सांगून ते तुम्हाला बँकेचे कर्ज मंजूर करुन देतील, असे सांगितले़ त्यानुसार डॉ़ खके यांना ८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन दिले़ त्याबरोबरच डॉक्टरांच्या नातेवाईकांनी या कंपनीत आपले पैसे गुंतवले़ असे एकूण १५ लाख ४० हजार ५०० रुपये गुंतविल्यानंतरही त्यांच्या लक्षात आले की या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेली प्रॉडक्टची किंमत ही कंपनीच्या प्रॉडक्टच्या किंमतीपेक्षा अधिक आहे, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस तपास करीत आहेत़