पुण्यात राडा! दोन गटांच्या हाणामारीत दहा गाडया फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 09:01 AM2017-12-26T09:01:37+5:302017-12-26T13:49:37+5:30
पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र कायम असून दोन गटातील हाणामारीतून वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पुणे- वारजे येथील रामनगर परिसरातील बापूजी बुवा चौकात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि. २५) रात्री हा प्रकार घटला असून या प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सारस बाळासाहेब मिसाळ (वय ३०, रा. रामनगर) यांनी वारजे पोलिसांत तक्रार दिली आहे.
सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास येथे उभ्या केलेल्या १० ते ११ वाहनांची तोडफोड करण्यात आली असून एका तरुणाने बांबू आणि दगडांच्या साह्याने गाड्या फोडल्याची प्राथमिक माहिती वारजे पोलिसांनी दिली आहे. त्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र परवा रविवार (दि. २४) रात्री गोकुळनगर पठार भागात नागरिकांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच, दुसºया दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या माध्यमातून एक तरुण तोडफोड करताना दिसत आहे. या तरुणाची काही तरुणांबरोबर भांडणे झाली होती. मात्र सोमवार रात्री ते मिळून न आल्याने, चिडलेल्या त्या तरुणाने गाड्यांवर राग काढला. सव्वा अकरा वाजता तो पाण्याच्या टाकीकडून हातात बांबू घेऊन बापूजीबुवा चौकात आला. चौकात लावलेली ह्युंदाई अॅसेंटवर बांबूने हल्ला करत काचा फोडण्याचा प्रयत्न केला. नंतर इतर गाड्यांवरही बांबू मारले. मात्र काचा फुटल्या नाहीत. यावेळी त्याने चिडून दगड उचलून गाड्यांच्या काचांवर घातला.
याचदरम्यान काही दुचाकीचालक रस्त्याने जात होते. मात्र त्यांनी त्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र तेथे राहणाºया नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
वारजे परिसरात गाड्या तोडफोड, जाळपोळीच्या घटना वाढत असून नागरिकांनी सतर्क राहत अशी घटना घडत असल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.