Pune Hoarding Collapse: रेल्वे प्रशासनानं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 22:56 IST2018-10-05T22:52:08+5:302018-10-05T22:56:04+5:30
लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत.

Pune Hoarding Collapse: रेल्वे प्रशासनानं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
पुणे- लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. त्या प्रकरणी आता रेल्वे प्रशासनानं प्रतिक्रिया दिली आहे. जुना बाजार चौकात होर्डिंग पडण्याची घटना दुर्दैवी असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. हे होर्डिंग एका ऍड एजन्सीला दिले होते. या होर्डिंगचा ढाचा मजबूत नव्हता. त्यामुळे मध्य रेल्वेने सदर एजन्सीला वारंवार सांगूनही होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आले नाही. अखेर रेल्वे प्रशासनाने हे काम त्यांच्याकडून काढून दुसऱ्या एजन्सीला दिले. होर्डिंग हटवण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते.
मध्य रेल्वेमार्फत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले जाणार असून, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. किरकोळ जखमी व्यक्तींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकानजीक असलेले हे लोखंडी होर्डिंग तुटून रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांवर पडले.
यात सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले. तसेच अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात देहूरोडमधील शामराव धोत्रे(48), पिंपळे गुरवमधील भीमराव कासार(70), नानापेठेतील शिवाजी परदेशी(40), जावेद मिसबाउद्देन खान (49) यांचा मृत्यू झाला आहे.