विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:19 AM2018-05-18T01:19:42+5:302018-05-18T01:19:42+5:30
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर सायंकाळी वळवाच्या पावसाचा जोरदार शिडकावा झाला. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
पुणे : दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांवर सायंकाळी वळवाच्या पावसाचा जोरदार शिडकावा झाला. शहरातील विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहर मध्यवस्तीतील काही पेठा आणि उपनगरांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला. सिंहगड रोड परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपल्याने काही ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली.
दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी सहानंतर शहरात पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. टिंगरेनगर आणि सिंहगड रोड परिसरात जोरदार पाऊस कोसळला. सिंहगड रोड परिसरात वादळीवाºयामुळे ३ ते ४ झाडे पडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
पावसामुळे स्वारगेट, दौलतनगर, सिंहगड रस्ता, खडकवासला, गुरुवार पेठ, लोहगाव, धानोरी, वाघोली, अरण्येश्वर, विठ्ठलवाडी, हिंगणे, टिंगरेनगर, कात्रज, बिबवेवाडी, अप्पर, धनकवडी परिसर अशा विविध ठिकाणचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. खडकवासला धरण परिसरात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डोणजे व खानापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये सायंकाळी ६ पर्यंत ५ मिलिमीटर, महाबळेश्वर ०.२ व सातारा येथे ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.