पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांची बदली
By Admin | Published: July 5, 2016 09:37 PM2016-07-05T21:37:10+5:302016-07-05T21:37:10+5:30
चार वर्षांपासून पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत असलेले सुहास पाटील याची अखेर बदली झाली आहे. त्यांची जागा नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ५ : चार वर्षांपासून पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत असलेले सुहास पाटील याची अखेर बदली झाली आहे. त्यांची जागा नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान घेणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एक चांगला अधिकारी म्हणून संतान यांनी नागपूर विभागात आपली प्रतिमा तयार केली आहे. कामाशी प्रामाणिक असणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याकडे पुण्यासारख्या महत्वाच्या जिल्हाचा कारभार असावा, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतान यांचे नाव फायनल केले, अशी चर्चा आहे.
सध्या नागपुरात असलेल्या ४९ वर्षीय संतान यांनी ३ वर्षे नागपूरचे प्रभारी उपसंचालकपद सांभाळले. याआधी यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांचे क्रीडा अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
४६ वर्षीय सुहास पाटील हे मागील ४ वर्षांपासून पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी होते. त्याआधी ३ वर्षे ते सहायक संचालक होते. या ७ वर्षांच्या काळात त्यांच्याकडे क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्यपदही होते. क्रीडा विभागातील उपसंचालक जनक टेकाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर पाटील यांच्याकडे मागील आठवड्यात पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणून अतिरिक्त जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. ३ दिवसांपूर्वी त्यांनी सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी म्हणून सुत्रे स्वीकारली. पूर्वी साताऱ्याला असलेले अहमदनगर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी म्हणून उदय जोशी यांची बदली झाल्याचे कळते. काही बदल्यांसदर्भातील अधिकृत अध्यादेश अद्याप निघालेला नव्हता.
अशा झाल्या बदल्या...
जिल्हा क्रीडा अधिकारी (नाव, आधी व आताचा जिल्हा या क्रमानुसार) : सुहास पाटील (पुणे-सातारा), विजय संतान (नागपूर-पुणे), उदय जोशी (सातारा-अहमदनगर), अनिल चोरमले (अहमदनगर-सांगली), अविनाश पुंड (अमरावती-नागपूर), गणेश जाधव (बुलडाणा-अमरावती), अशोक गिरी (गोंदिया-बुलडाणा).
उपसंचालक (नाव, आधी व आताचा जिल्हा या क्रमानुसार) : आनंद व्यंकेश्वर (मुंबई-पुणे मुख्यालय), ना. गा. मोटे (पुणे मुख्यालय-मुंबई), प्रतिभा देशमुख (लातूर-अमरावती), जयप्रकाश दुबळे (अमरावती-नाशिक). (क्रीडा प्रतिनिधी)