दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:04 AM2018-02-20T07:04:36+5:302018-02-20T07:04:56+5:30

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात.

Repress the pressure and deal with the tests! | दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

Next

पुणे/पिंपरी : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात. मात्र, या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो या परीक्षांचे दडपण झुगारून त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे. पिंपरीमध्ये बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा कठीण गेली म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेतील यश म्हणजेच सर्वकाही मानून विद्यार्थी हे टोकाचे मार्ग अवलंबतात. मात्र, त्यांच्या या कृत्याचा पालकांना, कुटुंबीयांना आयुष्यभराचा धक्का सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणतणावांचा हसत-खेळत मुकाबला करायला शिकले पाहिजे.
नववी परीक्षा संपते नाही तोपर्यंत दहावीचे भूत मानगुटीवर बसलेलेच असते. कठोर शिस्तीमधील दहावीचे वर्ष पार पडल्यानंतर अकरावीची छोटीशी विश्रांती मिळते. त्यानंतर पुन्हा बारावी, नीट, सीईटी, जेईई, जेईई अ‍ॅडव्हान्स आदी परीक्षांच्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण कालखंड असतो. आपली तयारी चांगली झाली आहे, तसंच सर्वच विषय आपल्याला झेपणारे आहेत, असा आपला विश्वास द्विगुणित होतो.

काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाही
दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणाºयांची टक्केवारी
खूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापास
होऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना
वाटत असते. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
परीक्षेच्या बदलेल्या स्वरूपामुळे नापास होणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नापास होऊच शकत नाही, असा विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम समुपदेशकांकडून केले जाते.
पुणे विभागीय मंडळाकडून रमेश पाटील (पुणे) - ९८२२३३४१०१, एस. एल. कानडे (नगर) -९०२८०२७३५३, पी. एस. तोरणे
(सोलापूर) - ९९६०००२९५७ या समुपदेशकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेबाबतच्या कुठल्याही समस्येबाबत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थी त्यांना फोन करू शकतील असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मंडळाकडून समुपदेशक म्हणून आमचे मोबाइल क्रमांक जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातले काही फोन वेगवेगळया विषयांमधील अडचणींबाबत होते. काही विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना नेमके कशाचे दडपण येत आहे, याचा खोलात जाऊन शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या त्या कारणांनुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. दडपण दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. - पी. एस. तोरणे, समुपदेशक

विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला सारून मानसिक ताण न घेता धैर्याने परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे. दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन करून अभ्यास करावा व मुद्देसूद प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा. सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सकारात्मक दृष्टीने विचार करून परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे.
- एकनाथ उगले, पालक, निगडी

परीक्षेच्या काळात
ही काळजी घ्या
पुरेशी झोप घ्या. कमीत कमी
७ ते ८ तास झोप घ्या.
अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. जेवण, झोप व अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या.
लिहिणे आणि बसणे याचा सराव या काळात ठेवायलाच हवा.
परीक्षेच्या काळात शक्यतो मोबाइल फोन बंद ठेवणेच जास्त चांगले.
परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात वर्षभरात काढलेल्या नोट्सच्या अभ्यासवर भर द्यावा.
संपूर्ण दिवस अखंड अभ्यास करण्यापेक्षा, मधे मधे छोटे
ब्रेक, विश्रांती घ्यावी.
आवडीच्या विषयाने
अभ्यासाची सुरुवात करावी.
परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मॉडेल टेस्ट पेपर तीन तासांची
वेळ लावून सोडवण्याचा सराव करायला हवा.
गरज वाटत असल्यास,
मोठ्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
प्रत्येक दिवशी स्वत:च्या सोयीनुसार व आवडीनुसार
सर्वच विषयांना थोडा-थोडा
वेळ द्यावा.

Web Title: Repress the pressure and deal with the tests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा