पोलिसाला धडक देऊन जखमी करणार्या रिक्षाचालकास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 05:51 PM2017-10-10T17:51:38+5:302017-10-10T17:56:38+5:30
भरधाव वेगाने रिक्षा चालवून पोलिसाला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी रिक्षाचालकास न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
पुणे : भरधाव वेगाने रिक्षा चालवून पोलिसाला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी रिक्षाचालकास न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. के. नंदनवार यांनी हा आदेश दिला. आरोपी घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला नाही. त्याने जखमी व्यक्तीस वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी रुग्णालयात नेण्याचे औदार्य दाखविल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
शौकतअली गुलामअली खान (वय ४५, रा. कोंढवा ब्रुद्रुक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी देवेंद्र रामकृष्ण व्हटकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार खान विरोधात भारतीय दंड विधान कलम २७९, ३३७ आणि मोटार वाहन अधिनियम कलम ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना १७ सप्टेंबर २०१४ रोजी येरवडा येथील कारागृहासमोर घडली. फिर्यादी हे येरवडा कारागृह येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी त्यांच्या मुलाने त्यांना दुचाकीवरून येरवडा कारगृह येथे सोडले. रस्ता ओलांडताना मनोरुग्णालयाकडून भरधाव वेगात आलेल्या रिक्षाची धडक व्हटकर यांना बसली. त्यात, त्यांच्या डोक्याला मार लागून हात मोडला होता. यावेळी, येथील गार्डकर्मचारी व रिक्षाचालकाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तो निघून गेल्याने त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. यात फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली.