पुण्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 08:06 AM2019-02-12T08:06:35+5:302019-02-12T08:52:28+5:30
शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकत्याचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान दरीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे.
पुणे : शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकत्याचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान दरीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे. विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२, रा. कात्रज) असे त्यांचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी देण्यात आली होती.
विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत होते. त्यात त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. सोमवारी दुपारी पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत एका कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. भारती विद्यापीठ पोलीस व पौड पोलिसांनी हा मृतदेह दरीतून वर आणला. त्याच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचे ओळखले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.