‘पिफ’च्या अनुदानासाठी शासनाला साकडे : डॉ. जब्बार पटेल; अंदाजपत्रक दीड कोटीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:16 PM2017-12-19T12:16:52+5:302017-12-19T12:20:48+5:30
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अनुदान ७० लाखांवरून वाढवून २ कोटी रुपये करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पुणे : राज्य सरकारच्या अधिकृततेची मोहोर उमटलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अनुदान ७० लाखांवरून वाढवून २ कोटी रुपये करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार, सुधारित प्रस्तावानंतर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा आशावाद महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येत असल्याने अंदाजपत्रकात १४ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. पिफचे अंदाजपत्रक दीड कोटी असते. त्यातील सत्तर लाख सरकारतर्फे दिले जातात, तर उर्वरित सत्तर लाख नोंदणी, प्रायोजकत्व यातून जमा केले जातात. सरकारने दिलेल्या सत्तर लाखांपैकी वीस लाख विविध पुरस्कारांवर खर्च होतात. त्यामुळे अनुदान वाढवून मिळावे अशी मागणी पुणे फिल्म फाउंडेशन गेल्या तीन वर्षांपासून करत आहे. पटेल म्हणाले, ‘‘चित्रपटांची रॉयल्टी वाढली असल्याने महोत्सवाचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये वाढ व्हावी, यादृष्टीने शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.’’
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट वगळण्यात आल्याने रसिकांना या कलाकृतींना मुकावे लागले. त्यामुळे यंदाच्या ‘पिफ’मध्ये हे चित्रपट पाहायला मिळतील का, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. ‘न्यूड’ या चित्रपटाच्या सेन्सॉरची प्रक्रिया सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत प्रमाणपत्र मिळाल्यास हा चित्रपटचा समाविष्ट होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असल्याचे कारण देऊन इफ्फीमधून ‘न्यूड’ वगळण्यात आला. सध्या चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यात हा चित्रपट सेन्सॉरचे चेअरमन पाहतील, अशा स्वरूपाचा ई-मेल आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाल्यास चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत विचार केला जाईल. ‘पिफ’मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास आनंदच होईल.
- रवी जाधव, दिग्दर्शक, न्यूड
पिफमध्ये मराठी चित्रपटांच्या प्रवेशासाठी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सहकार्याने चित्रपटांच्या सेन्सॉरची प्रक्रिया तपासली जाऊन, महोत्सवात त्यांचा समावेश केला जातो. १५ डिसेंबरपर्यंत चित्रपटांच्या प्रवेशिका स्वीकारण्यात आल्या असून, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. जागतिक चित्रपटांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी घेण्यात आली आहे.
- डॉ. जब्बार पटेल, दिग्दर्शक
११ जानेवारीपासून रंगणार पिफ
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ’ यंदा ११ ते १८ जानेवारी दरम्यान होणार असून, ‘तरुणाई’ ही या महोत्सवाची प्रमुख थीम आहे. ‘पिफ’मध्ये समाविष्ट असलेल्या ‘वर्ल्ड काँपिटिशन’ या विभागातील चित्रपटांची नावे पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या विभागात १४ चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी यावर्षी तब्बल ९१ देशांमधून १००८ चित्रपट प्राप्त झाले होते. यातील निवडक असे २०० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटांबरोबरच चित्रपटांशी संबंधित विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रदर्शन यांचाही महोत्सवात अंतर्भाव असेल, असेही डॉ. पटेल यांनी या वेळी नमूद केले. महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त व निवड समिती सदस्य सतीश आळेकर, निवड समिती सदस्य व क्रिएटिव्ह हेड अभिजित रणदिवे, विश्वस्त सबीना संघवी या वेळी उपस्थित होते.