संभाजी भिडे यांच्या मागे अवघी पोलीस यंत्रणा वारी सोडली ‘वाऱ्यावर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:47 AM2018-07-08T01:47:12+5:302018-07-08T01:48:07+5:30
धारक-यांचे सर्वेसर्वा असलेल्या संभाजी भिडेगुरुजी यांना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, अशी पोलिसांनी नोटीस बजावली असतानाही ते पालखी सोहळ्यात दाखल झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
पुणे - धारक-यांचे सर्वेसर्वा असलेल्या संभाजी भिडेगुरुजी यांना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, अशी पोलिसांनी नोटीस बजावली असतानाही ते पालखी सोहळ्यात दाखल झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. संभाजी भिडेगुरुजींना आवरायचे की पालखी सोहळा नियंत्रित करायचा, अशा कात्रीत पोलीस यंत्रणा सापडली होती.
गतवर्षीच्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडेगुरुजी हे धारकºयांसमवेत नंग्या तलवारी घेऊन सहभागी झाल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे यंदाच्या पालखीत त्यांना सहभागी होण्यास विरोध करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना पालखीत सहभागी होऊ नये, याबाबत नोटीस बजावली होती; मात्र संभाजी भिडे हे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यावर ठाम होते. त्यांच्यासमवेत शेकडो अनुयायी भगवे फेटे घालून हजर होते. ते जंगलीमहाराज मंदिरात बसले होते. त्यामुळे मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यांच्यासह शेकडो धारकºयांना सोहळ्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली होती. जगद्गुरू तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज यांचा पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर धारकºयांना जाण्यास सांगण्यात आले होते. जंगलीमहाराज रस्त्यावरून शेकडो धारकरी येत असताना त्यांना लोकमंगलच्या समोर अडविण्यात आले. तिथे धारकºयांनी ‘विठ्ठल माऊली’चा जयघोष सुरू केला. त्यांना नियंत्रित करण्याची मोठी जबाबदारी पोलीस यंत्रणेवर पडली.
श्रीसंत तुकाराममहाराज यांच्या पालखीचे संचेती हॉस्पिटलच्या परिसरात आगमन होताच संभाजी भिडे पालखीपाशी गेले. त्यांनी पालखीचे दर्शन घेऊन दोन मिनिटे पालखीचे सारथ्य केले. काहीशा विलंबानंतर संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे आगमन झाले; मात्र त्या पालखीला नियंत्रित करण्याऐवजी संभाजी भिडे यांच्यावरच पोलिसांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते. पालखी सोहळ्याला कोणतेही गालबोट लागू नये, याची संपूर्ण दक्षता पोलिसांकडून घेतली जात होती. पालखीचे दर्शन घेण्यास भिडे पुढे सरसावले तसे पोलीस त्यांच्या मागे गेले. त्यांनी शांततेत पालखीचे दर्शन घेतले. पालख्या मार्गस्थ झाल्यानंतरही धारकरी तब्बल दीड तास तिथेच बसून होते. त्यानंतर धारकºयांना सोडून देण्यात आले.
प्रेरणा मंत्राचा लोकजागरण कार्यक्रम
रायगडावर प्रत्येक दिवशी खडा पहारा देण्यासाठी २ हजारांची एक तुकडी तयार करण्याचे आवाहन करत त्यासाठी प्रत्येकाने ३१ जुलैपूर्वी यादी द्यावी, अशा सूचना श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली. पुण्यातील जंगलीमहाराज मंदिरात त्यांनी धारकºयांना मार्गदर्शन केले. रायगड सुवर्णसिंहासन साकारण्यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने राज्यातील प्रत्येक गावात पहाटेच्या सुमारास जावे. त्याकरिता प्रेरणा मंत्राचा लोक जागरण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.