सासवड नगरपालिका हद्दीत संपूर्ण दारूबंदी
By admin | Published: May 12, 2017 04:58 AM2017-05-12T04:58:10+5:302017-05-12T04:58:10+5:30
संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय आज (दि. ११) झालेल्या सासवड नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय आज (दि. ११) झालेल्या सासवड नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत नगरपालिकेच्या हद्दीत असलेले राज्य व केंद्रीय शासनाचे मार्ग नगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा ठराव झाला होता. सासवड शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज या मूलभूत सोयी देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे नगरपालिकेने सांगितले, तरी दारूधंद्यासाठी हा निर्णय घेतल्याची जोरदार टीकाही झाली. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने नगरपालिका हद्दीत दारूबंदी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे.
इथून पुढे दारू दुकाने, मावा आदींसाठी नगरपालिका ‘ना हरकत’ दाखला देणार नाही, परवानगी देणार नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
याविषयी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप म्हणाले, ‘‘नगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या पालखी महामार्गावर दार दोनशे फुटांवर पाणी, ड्रेनेज व वीज यांसाठी तीन पाईप टाकावेत, अशा सूचना यापूर्वी वारंवार शासनाच्या बांधकाम विभागाकडे केल्या आहेत. त्या मंजूर होत नसल्याने नगरपालिकेने महामार्ग ताब्यात घेण्याचा ठराव केला. मात्र, दारूधंद्यांसाठी रस्ते ताब्यात घेणार, असा त्याचा अर्थ काढला. त्यामुळे जनमताचा आग्रह लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.’’
दारूबंदी ठराव करणारी भारतातील ही पहिली नगरपालिका आहे. याचे अनुकरण इतर नगरपालिकांनी करावे, असेही जगताप म्हणाले.
सासवड पोलीस ठाण्याच्या विनंतीनुसार शहरातील विविध चौकांत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद व लोकसहभागातून ही सोय उपलब्ध करणार आहे. सासवडच्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात येईल.
या प्रसंगी मुख्याधिकारी विनोद जळक, उपाध्यक्ष विजय वढणे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, मनोहर जगताप, संदीप जगताप, संजय ग. जगताप, प्रवीण भोंडे, दीपक टकले, सचिन भोंगळे, गणेश जगताप, दिनेश भिंताडे, नगरसेविका पुष्पा जगताप, निर्मला जगताप, वसुधा आनंदे, सारिका हिवरकर, सीमा भोंगळे, विद्या टिळेकर, माया जगताप, मंगल म्हेत्रे, डॉ. अस्मिता रणपिसे उपस्थित होत्या.