'माढ्याचा तिढा सुटला', दस्तुरखुद्द शरद पवारांनीच केली उमेदवाराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:45 PM2019-03-22T17:45:51+5:302019-03-22T17:46:41+5:30

शरद पवारांनी घेतलेली माघार यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा तिढा निर्माण झाला होता.

Sharad Pawar announcement of the candidate for madha lok sabha from NCP, sanjay shinde | 'माढ्याचा तिढा सुटला', दस्तुरखुद्द शरद पवारांनीच केली उमेदवाराची घोषणा

'माढ्याचा तिढा सुटला', दस्तुरखुद्द शरद पवारांनीच केली उमेदवाराची घोषणा

googlenewsNext

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच बारामती येथील पक्षाच्या कार्यक्रमात संजय शिंदेची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करत असल्याची घोषणा केली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. 

शरद पवारांनी घेतलेली माघार यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा तिढा निर्माण झाला होता. मात्र, हा तिढा आज खुद्द पवारांच्या उपस्थितीत सुटला आहे. माढ्यातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना-भाजपाच्या मदतीनं सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शिंदे यांनी शरद पवार यांच्या उस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. 
सुरुवातीला माढ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव चर्चेत होतं. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढवायची असल्यानं शरद पवार यांनी माघार घेतली. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी नको, असं म्हणत पवारांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. सध्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभेत माढ्याचं प्रतिनिधीत्व करतात. विजयसिंह यांचे पुत्र राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र, उमेदवारी मिळण्याची फारशी शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये गेल्यानं राष्ट्रवादी माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा होती. मात्र, आज या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून माढ्याचा तिढा सुटला. शरद पवार यांनी बारामती येथील निवासस्थानी बैठक घेऊन संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी संजय शिंदे हे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना थोड्या फरकानं पराभव पत्करावा लागला. मात्र, आता संजय शिंदेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे माढ्यातील लढत अधिकच रंगतदार होईल, असे दिसून येते. 
 

Web Title: Sharad Pawar announcement of the candidate for madha lok sabha from NCP, sanjay shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.