शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा : छत्रपती संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 08:00 PM2018-07-11T20:00:05+5:302018-07-11T20:01:04+5:30
शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’ नेही मोलाचे योगदान : छत्रपती संभाजीराजे
पुणे : शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण व्हावा, याकरीता आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवराज्याभिषेक उत्सवाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे रायगडावर दर वर्षी फुलांची आकर्षक आरास केली जाते. त्यामुळे या सोहळ्याला देखणेपण आले आहे. शिवराज्याभिषेक लोकोत्सव होण्यात ‘दगडूशेठ’ नेही मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे भविष्यातही शासनाने किल्ले दत्तक योजना सुरु केल्यानंतर ट्रस्टने यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल, असे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या बाजीराव रस्त्यावरील गणेशोत्सव सजावट विभागाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, अतुल चव्हाण, अक्षय गोडसे, राजेंद्र चिंचोरकर आदी उपस्थित होते. शिल्पकार विवेक खटावकर यांनी यंदाच्या सजावटीची माहिती दिली.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘अनेक ठिकाणी सीएसआर निधी सामाजिक कामांसाठी वापरला जातो. भविष्यात किल्ले दत्तक योजना सुरु झाल्यानंतर अनेकांकडून हा निधी किल्ल्यांसाठी वापरणे देखील आवश्यक आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टने पुढाकार घेतल्यास किल्ले संवर्धनाचा चांगला संदेश समाजात जाईल. किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना जगभर पोहोचवण्याचे काम देखील होणार आहे.’