रामप्रहरी ज्योतिषाऐवजी विज्ञान दाखवा - डॉ. जयंत नारळीकर
By admin | Published: February 28, 2017 01:20 AM2017-02-28T01:20:32+5:302017-02-28T11:16:47+5:30
अवकाशसंशोधनासाठी अवघी हयात खर्ची घातलेले एक महान खगोलशास्त्रज्ञ म्हणजे डॉ. जयंत नारळीकर.
पराग पोतदार,
पुणे - अवकाशसंशोधनासाठी अवघी हयात खर्ची घातलेले एक महान खगोलशास्त्रज्ञ म्हणजे डॉ. जयंत नारळीकर. आज निवृत्तीनंतरही ते दररोज ‘आयुका’मध्ये न चुकता जातात, अत्यंत उत्साहाने मुलांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देतात... कधी संधी मिळाली, की शालेय विद्यार्थ्यांनाही शिकवण्यात रमतात. अशा कार्यमग्न दीपस्तंभाशी ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’च्या निमित्ताने साधलेला संवाद...
गेल्या काही दिवसांतील इस्रोची उल्लेखनीय कामगिरी तसेच इतर काही विधायक घटना पाहिल्या तर असे लक्षात येते काही भारत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चांगली भरारी घेत आहे. या साऱ्या प्रगतीकडे आपण कसे पाहता?
भारत सध्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करीत आहे, परंतु जगभरात जे काही घडत आहे त्याचा भाग होत असताना आपण विज्ञानाच्या विकासासाठी चांगली नियोजनबद्ध पावले टाकणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. उदाहरणादाखलच सांगायचे झाले, तर भारताने अवकाशसंशोधनाच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे मोठे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. गुरुत्वाकर्षणाच्या लहरी मोजण्यासाठी तयार करण्यात येत असलेला लायगो डिटेक्टर हा असाच एक महाप्रकल्प आहे. एका देशाच्या कुवतीबाहेरची ही गोष्ट असल्याने पाच-सहा देश एकत्र येऊन ते करीत आहेत. भारतही त्याचा भाग होत आहे. त्याचप्रमाणे ३० मीटर व्यासाची महादुर्बिण साकारली जात आहे. त्यातही भारतासह काही देशांचा समावेश आहे. असे प्रकल्प हाती घेत असताना व्यापक हिताचा विचार करावा लागतो. विज्ञान संशोधनाबरोबरच त्याच्या चांगल्या परिणामांसाठी काही निकष लावावे लागतात. आता जी महादुर्बिण साकारली जात आहे, त्यासाठी हवाई येथील मोनाकिया हा ५ हजार मीटर उंचीवरचा डोंगर निश्चित केलेला आहे. परंतु तिथेही आता भूमिपुत्र जागे झाल्याने त्यांनी ‘येथे आमचे देव राहतात,’ असे सांगत या प्रकल्पाला कायदेशीर अटकाव केला आहे.
(अवघा देश ‘विज्ञानाभिमुख’ व्हावा)
(येणारा काळ भारताचाच !)
(विज्ञान संशोधनात स्त्रिया मागे का?)
या साऱ्या पार्श्वभूमीवर भारताने काय लक्षात घ्यायला हवे, तर जेव्हा आपण अशा प्रकल्पांचा भाग होऊ तेव्हा ते वापरणारे लोक आपल्याकडे आहेत का? महादुर्बिणीचा भाग होताना, त्यात १० टक्के गुंतवणूक आपली असेल तर आपल्याला त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी ३०० चांगल्या रात्रींपैकी ३० रात्री प्राप्त होऊ शकतात. त्याचाही पुरेपूर वापर आपण करू शकतो का? याचा नीट विचार व्हायला हवा.
वैज्ञानिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत राहावा, यासाठी भारताने काय करणे गरजेचे आहे?
मला वाटतं, याबाबतीत अजूनही आपल्याकडे त्याबाबतीत पुरेशी जागरुकता नाही. कारण अशा मोठ्या प्रकल्पांच्या सहभागासाठी व प्रत्यक्ष वापरासाठी चांगल्या विद्यार्थ्यांतून अभ्यासू संशोधक तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगले विद्यार्थी तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. आता महादुर्बिणीचेच उदाहरण घ्या. ही दुर्बिण पूर्णत: तयार होण्यासाठी किमान ७-८ वर्षे लागतील. त्यादृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न केले तरच हे विद्यार्थी तयार होतील आणि मग खऱ्या अर्थाने अशा महाप्रकल्पांमधील आपला सहभाग योग्य ठरेल.
आजकाल विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे वळत नाहीत, त्यांना विज्ञानक्षेत्रातही सारे काही झटपट हवे असते यात कितपत तथ्य आहे? ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करायला हवे?
- आजमितीला मूलभूत विज्ञानाकडे काही प्रमाणात विद्यार्थी वळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र सगळेच विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे वळून चालणार नाहीत. त्यामध्येदेखील आपल्याला बरेचसे विद्यार्थी हे उपयोजित विज्ञानाकडे (अॅप्लाईड सायन्स) किंवा अभियांत्रिकीकडे जाणारे लागतीलच. ज्यांना विज्ञानाची खरी गोडी आहे आणि मूलभूत विज्ञानात जी विशिष्ट तऱ्हेची हुशारी लागते ती असेल अशा विद्यार्थ्यांना मात्र मूलभूत विज्ञानाकडे वळवावे लागेल.
आज तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे. दरघडीला एक नवे संशोधन आपल्या पुढे, आपल्या सेवेत उभे ठाकते आहे, अशा वेळी विज्ञानाची भूमिका काय असायला हवी?
- विज्ञानाला त्याची अशी भूमिका नसते. कारण ते तटस्थ आहे. विज्ञानाचा वापर करणाऱ्या माणसाच्या हातात त्याचे भवितव्य आहे. तुमच्या हातात विज्ञानाने मोबाईल नावाचे आयुध दिलेले आहे त्याचा वापर कसा करायचा, हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यावर सकाळी उठल्यापासून ज्योतिषाकडून भविष्य जाणून घेण्यात तुम्हाला रस असेल, तर निश्चितच त्या विज्ञानाचा चुकीचा वापर होतोय, असं म्हणावं लागेल. विज्ञानाशी जवळीक साधताना त्याची शक्ती काय आहे, हे आधी समजून घ्यावं लागेल. त्याचा कुठला आणि कसा फायदा घ्यायचा हेदेखील ठरवावं लागेल. विज्ञानाच्या कक्षा रुंदावतच जाणार आहे. त्याबरोबरीने आपली सकारात्मक आणि विधायक वापराची दृष्टी विस्तारते आहे का, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
सध्याच्या काळात वाहिन्यांमधून आणि मुद्रित माध्यमांमधून ते काही सातत्याने प्रसारित अथवा प्रसिद्ध केले जाते, त्याकडे एक शास्त्रज्ञ या भूमिकेतून आपण कसे पाहता? प्रसारमाध्यमांची भूमिका अधिक सजग असायला हवी, असे आपल्याला वाटते का?
- सध्याची परिस्थिती विचाराल तर एकंदर परिस्थिती निराशाजनक आहे, असे मला वाटते. कारण सकाळी कुठलीही वाहिनी सुरू करा आपल्याला त्यावर एक भविष्य सांगणारा ज्योतिषी वाहिन्यांनीच नेमलेला दिसतो. मला वाटतं, अशा गोष्टींमध्ये वेळ घालविण्याऐवजी त्या वेळेत तरुणांना जोडू शकेल, असे काही वैज्ञानिक कार्यक्रम दाखवले तर ते अधिक चांगले ठरेल. दुर्दैवाने तसे कुठेही होताना दिसत नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विस्फोट होतोय हे खरं, पण कशासाठी त्याचा वापर व्हायला हवा, याचा विचार, त्याविषयीचे चिंतन मात्र होताना दिसत नाही.
आपला सर्वांसाठी संदेश काय?
- संदेश फक्त नेते देतात. पण एक विज्ञानप्रेमी अभ्यासक म्हणून मला काय वाटतं तेवढं सांगतो. विज्ञान दिन आपण दरवर्षी साजरा करतो. पण तो साजरा का करायचा? असा प्रश्न कधी आपण स्वत:ला तरी विचारतो का? विज्ञानाची अफाट, अनंत शक्ती ओळखून त्याचा नेमकेपणाने कसा सकारात्मक वापर करायचा, याचा विचार आपल्या मनामध्ये रुजावा, यासाठी हा दिवस साजरा करायचा. खरे तर हा दिवस म्हणजे केवळ निमित्त. आपला प्रत्येक दिवसच विज्ञानाशी जोडलेला... बांधलेला आणि सांधलेला आहे. विज्ञान दिनाच्यानिमित्ताने आपल्या संपूर्ण आयुष्याला व्यापून उरणारे आणि आपल्या आयुष्याला अधिक उन्नत, प्रगत करणारे जे विज्ञान आहे त्याचे महत्त्व आपण जाणण्याचा प्रयत्न करायला हवा.
(लेखक लोकमत पुणे आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)