मावळमधील जाधववाडी धरणात सहा जण बुडाले : तीन व्यक्तींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 06:32 PM2019-05-19T18:32:21+5:302019-05-19T18:33:22+5:30
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते.
पुणे :उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की,प्रशील अमोल आढाव (वय ७ वर्षे) , अनिल कोंडींबा कोळसे (वय ५८) , प्रितेश रघुनाथ आगळे (वय ३२ ) तिघेही रा.घाटकोपर मुंबई अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार. खबर देणाऱ्या स्वप्नील दादासाहेब गायकवाड यांच्या घरी आलेले हे पाहुणे उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील जाधववाडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काहीजण धरणाच्या पाण्यात उतरले. त्यात अचानक अनिल कोंडींबा कोळसे यांचा पाय घसरला. त्यावेळी त्यांनी मागे उभे असलेल्या दादासाहेब पोपट गायकवाड, प्रशिल अमोल आढाव यांना पकडले. आणि ते दोघेही पाण्यात पडले .त्यांना वाचविण्यासाठी प्रितेश रघुनाथ आगळे यांनीही पाण्यात उडी मारली. त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संगीता दादासाहेब गायकवाड व उत्कर्ष दादा गायकवाडही बुडू लागल्याने नातेवाईकांनी आरडाओरड केली.तो आवाज शेजारी असलेल्या एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी ऐकला. त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत तिघांचे प्राण वाचवले मात्र उर्वरित तिघांना तळेगाव येथील जनरल हाॅस्पीटलमध्ये नेले असता त्यापूर्वीच मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.