...म्हणून रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते अस्वस्थ : रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 05:47 PM2019-02-24T17:47:55+5:302019-02-24T17:49:43+5:30
आरपीआयला युतीत एकही जागा न दिल्यामुळे देशभरातील आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. असे वक्तव्य रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.
पुणे: भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यात झालेल्या युतीचे आरपीआयतर्फे स्वागतच आहे. मात्र, आरपीआयला अनुल्लेखाने बाजूला करणे योग्य नाही. आरपीआयला एकही जागा न दिल्यामुळे देशभरातील आरपीआय कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव ,हनुमंत साठे ,शहराध्यक्ष अशोक कांबळे आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत म्हणून आरपीआयला त्यांनी उनुल्लेखाने बाजूला ठेवणे बरोबर नाही. आरपीआयने दक्षिण मुंबईतील जागा मागितली होती. मात्र शिवसेनेने ही जागा दिलेली नाही. शिवसेना जागा देत नसेल तर भाजपाने ईशान्य मुंबईतील जागा आरपीआयला द्यावी. देशभर आणि महाराष्ट्रात आरपीआयमुळे भाजपा-सेनेला फायदा होत आहे. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांना नाराज करू नये. आरपीआयला लोकसभेसाठी एक जागा तर विधानसभेसाठी आठ ते दहा जागा द्याव्यात.
वंचित आघाडीमुळे शिवसेना आणि भाजप यांना फायदा होणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी कितीही सभा घेतल्या तरी काहीही उपयोग होणार नाही, असेही आठवले म्हणाले.