सामाजिक उद्रेक कोण रोखेल? डॉ. गणेश देवी यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:34 AM2017-09-16T03:34:38+5:302017-09-16T04:22:20+5:30
तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला.
पुणे : देशातील शिक्षणव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शिक्षणमंत्र्याकडेच पदवी नसेल, तर राज्याच्या शिक्षणाचे भविष्य अंधकारमय आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांची वीण घट्ट करण्यासाठी नियंत्रणात्मक नियमावली असावी. राज्याची शैक्षणिक, वैचारिक प्रगतिशीलता प्रवाही नसेल तर वाटचाल स्थिर होईल. तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एस. एम. जोशी सभागृहात डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते आणि भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे संचालक अतुल गोतसुर्वे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.
कवी सुधाकर गायधनी (साहित्य पुरस्कार), ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य (भला माणूस पुरस्कार), अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर (सांस्कृतिक सेवा पुरस्कार), संस्कृती प्रकाशनाच्या संचालक सुनीताराजे पवार (स्नेहबंध पुरस्कार), युवा लेखक नितीन शिंदे (सनद पुरस्कार) आदी मान्यवरांना या वेळी गौरवण्यात आले. या वेळी बाळासाहेब बाणखेले आणि डॉ. आशुतोष गाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
देवी म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर महात्मा गांधींनी दोन वर्षांनी गुजरात विद्यापीठ सुरू केले. या दोघांनीही दूरदृष्टीने शिक्षणव्यवस्थेचा विचार केला. समाजाचा विविध अंगांनी विचार करून त्याप्रमाणे तरुण पिढीचे उज्ज्वल भवितव्य घडवता आले, तरच शैक्षणिक संस्था उपयुक्त ठरू शकतात. कारण, ज्ञान आणि शिक्षण हा व्यवहार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘कविवर्य नारायण सुर्वे हे ‘उंच लेखक’ होते, तरीदेखील मराठी साहित्यातील समीक्षकांना सुर्वे उमगलेच नाही. सुर्वेंच्या साहित्याची अपेक्षित समीक्षा झालीच नाही. त्यांची कविता प्रचारकी थाटाची नव्हती. त्यांच्या लेखनातून विचार करून कृती करण्याची प्रेरणा मिळते. व्याकुळ करणारी वेदना आणि आयुष्याची हमी देणारी आशा त्यांच्या कवितेत सापडते. सध्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आली आहे. अशा काळात स्त्रिया अभिव्यक्त होणार असतील, तर त्यावर कदापि गदा आणता येणार नाही. साहित्यिकांत प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण व्हायला हवे.’’
सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
आजच्या काळात कवींपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कवी कोणत्याही एका प्रदेशाचा नसतो, तर तो पृथ्वीचा असतो. पृथ्वीचा परम लाडका मित्र, प्रतिसृष्टीचा फकीर आणि अभाग्यांचा मित्र असतो. कविता भोगायची नसते, तर ती अनुभवायची असते. कवीचे प्रेषिताशी नाते जोडलेले असते. कविता रसिकाच्या मनातून मिळालेल्या प्रतिसादावर मोठी होत असते. आजकाल कलमी कवितांचे पेव फुटले आहे. मात्र, एकचित्त करते तीच खरी कविता असते.
- सुधाकर गायधनी
रयत शिक्षण संस्थेशी नारायण सुर्वे यांचे अदृश्य नाते होते. संस्थेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील ४२ आत्महत्याग्रस्त मुलांची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. शिक्षणाची नाळ तूटू न देता काळानुसार पद्धत बदलली पाहिजे. काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यांनी नुसते शिकून चालणार नाही, त्यातून कौशल्य निर्माण व्हायला हवे. जाती-धर्मापलीकडे जाऊन शिक्षण लोकाभिमुख झाले पाहिजे आणि गुणवत्तेवर आधारित रोजगार मिळावा.
- अनिल पाटील