पुण्यातल्या या पेठा बनल्या आहेत तिथली ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 05:30 PM2017-12-04T17:30:33+5:302017-12-04T17:37:39+5:30
पुण्यात असलेल्या अनेक पेठा आजही तिथ-तिथली ओळख आहेत. फार पुर्वीपासून असलेल्या या पेठा अजूनही स्वत:चं अस्तित्व धरून आहेत.
पुणे : पुण्यात अनेक पेठा आहेत. या विविध पेठांमुळेच जुन्या पुण्याची ओळख होती. आठवड्यांच्या वारांनुसार किंवा या पेठा ज्यांनी वसवल्या आहेत त्यांची नावं या पेठांना देण्यात आल्या आहेत. काही पेठांना इतिहासकालीन नावे देण्यात आली आहेत. 1665 साली जेव्हा शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली तेव्हा रंगो धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. कालांतराने दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यात जवळपास 22 ते 23 पेठा आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध आहेत, तर काही पेठांना आजही प्रसिद्धी मिळालेली नाही. तसंच पुण्याला पेशव्यांच्या राजधानीचे शहर म्हणूनही ओळखलं जातं. या काळात शेटे, महाजन आणि व्यवसायिक-व्यापारी यांच्याकडून या पेठा वसवलेल्या आहेत. आपण प्रत्येक पेठेविषयी थोडीशी माहिती घेऊया.
कसबा पेठ
शिवाजी महाराज पुण्यात येईपर्यंत पुणे हे कसबा पेठेपर्यंत मर्यादित होतं. त्याकाळी या कसबा पेठेची पूर्णतः दुर्दशा झाली होती. 1662 साली शिवाजी महाराज पुण्यात आले. त्यानंतर जिजाऊबाईंना कसबा पेठेची ही दुरवस्था पाहवली नाही. त्यांनी शिवाजी महाराजांकरवी कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. कसब्यातील लाल महालात शिवाजी महारांजे बालपण गेले, त्यामुळे हा महाल आता जगभरासाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखला जातो. पुण्याचं ग्रामदैवत असलेलं कसबा गणपती मंदिर, कुंभारवाडा, गावकोस मारुती मंदिर, तांबट आळी, त्र्यंबकेश्वर मंदिर, पुण्येश्वर मारुती मंदिर, शिंपी आळी, साततोटी हौद आदी प्रेक्षणीय स्थळं या पेठेत पाहायला मिळतात.
गंज पेठ
सवाई माधवराव पेशवा यांच्या राजवटीत गंज पेठेची स्थापना झाली. या पेठेला महात्मा फुले पेठही म्हणतात. महात्मा फुलेही गंज पेठेतच राहत होते. अस्पृश्यांची पहिली शाळाही या पेठेत स्थापन झाली होती. महात्मा फुले यांच्या निधनानंतर गंज पेठेला महात्मा फुले पेठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. टिंबर मार्केट आणि भवानी मच्छी मार्केट या पेठेत प्रसिद्ध आहेत.
गुरुवार पेठ
गुरुवार पेठेला वेताळ पेठ असंही म्हणतात. १७३० साली जिवाजीपंत खासगिवळे यांनी ही पेठ विकसीत केली. या ठिकाणी कधीकाळी हत्तींची झुंज लावली जायची. त्यामुळे ही झुंज पाहायला लांबून लोक येत असत.
नवापुरा पेठ
जीवन घनशाम यांनी १७८८ साली पेशवे सरकारांकडे एक पेठ वसवण्याची परवानगी मागितली. परंतु, परवानगी मिळूनही ही पेठ वसू शकली नाही. त्यानंतर नऊ वर्षांनी माधवराव रामचंद्र यांनी ती पेठ वसवण्याची जबाबाबदारी स्वीकारली. दुर्दैवाने त्यांनाही या बाबतीत यश मिळाले नाही, आणि पुण्यातील नवापुरा नामक पेठ वसता वसता वसायची राहून गेली. कालांतराने इथे वस्ती वाढत गेली आणि नवापुरा पेठ वसत गेली. भवानी पेठेच्या पूर्वेला ही पेठ आहे.
नवा पेठ
पानशेतच्या पुरामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालं होतं. त्यामुळे निर्वासितांना वसवण्यासाठी नवी पेठ स्थापन करण्यात आली. अलका टॉकीज चौकापासून दांडेकर पुलापर्यंतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा असलेला भाग म्हणजेच नवा पेठ.
नागेश पेठ
१९६५ ते ७० च्या काळात या पेठेला न्याहाल पेठ असं नाव होतं. पूर्वी न्याहाल पेठेत पुण्याच्या संपूर्ण वस्तीपैकी एक टक्का लोक राहात होते. पुणे नगरपालिकेने या पेठेचं नाव अधिकृतरित्या नागेश पेठ केलं. १९५० सालीच हे या पेठेचं नामांतरण करण्यात आलं होतं. मात्र १९६० ते ७० पर्यंत या पेठेला न्याहाल पेठ म्हणूनच ओळखलं जाई.
आणखी वाचा - पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी
नाना पेठ
सध्या ज्या ठिकाणी घरगुती सामानांचा बाजार भरला जातो तोच नाना पेठ. नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर या पेठेला नाना पेठ असं नाव देण्यात आलं. त्याआधी या पेठेला निहाल पेठ असं म्हटलं जाई.
नारायण पेठ
नारायणराव पेशवांच्या राजवटीत ही पेठ वसवण्यात आली. तो काळ होता १७७३ सालचा. सुप्रसिद्ध असा केसरी वाडा म्हणजेच गायकवाड वाडा या नारायण पेठेतच आहे.
बुधवार पेठ
सध्या पुस्तकांच्या बाजारपेठेमुळे प्रसिद्ध असलेला बुधवार पेठ औरंगजेबच्या काळात मोहिताबाद म्हणून ओळखला जायचा. थोरले माधवराव पेशवा यांच्या काळात या मोहिदाबादेचं बुधवार पेठ असं नामांतरण झालं. या भागात अनेक पुरातन मंदिरे आहेत. पुण्याची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी हिचे मंदिर आणि प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिरसुद्धा याच भागात आहे. तसंच बुधवार पेठेतील काही भागात वेश्याव्यवसायही चालतो.
भवानी पेठ
भवानी पेठेला पूर्वी बोरवन या नावाने ओळखलं जायचं. पूर्वी इथं बोराची अनेक झाडं होती. त्यावरुन बोरवन म्हटलं जाई. त्यानंतर इथं असलेल्या भवानी मंदिरामुळे या पेठेला भवानी पेठ असं नाव देण्यात आलं. आता या ठिकाणी हार्डवेअर, टिंबर आणि स्टिलचे मोठे व्यवसाय आहेत. सरदार नाना फडणवीस यांनी या ठिकाणी असे व्यवसाय सुरू केले होते. कालांतराने या व्यवसायांनी मोठे स्वरुप प्राप्त केले. आजही असे व्यावसायिक येथे सापडतात.
मंगळवार पेठ
विविध व्यवसायांमुळे मंगळवार पेठ प्रसिद्ध आहे. पूर्वी या विभागाला शाहिस्तेपुरा म्हणून ओळखलं जायचं. पानशेत पुराचा फटका या पेठेलाही बसला होता. संपूर्ण पेठ या पुरामुळे उध्वस्त झाला होता. पण कालांतराने ही पेठ पुन्हा वसवण्यात आली. येथील जुना बाझारमुळे ही पेठ प्रसिद्ध आहे.
रविवार पेठ
बालाजी बाजीराव पेशवे, व्यवहारे, महाजन आणि जोशी यांच्या काळात या पेठेला रविवार पेठ असं नाव देण्यात आलं. पूर्वी या पेठेला मलकापूर असं नाव होतं. या पेठेतील व्यवसाय रविवारी बंद असतात, त्यामुळे या पेठेला रविवार पेठ असं नाव देण्यात आलं.
रास्ता पेठ
सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या नावाने या पेठेला रास्ता पेठ असं नाव देण्यात आलंय. १७७५ साली स्थापन झालेल्या या पेठेला पूर्वी शिवपुरी असं नाव देण्यात आलं होतं.
शनिवार पेठ
१७३० साली हा शनिवार वाडा थोरले बाजीराव यांनी बांधला. या शनिवार वाड्यामुळे या पेठेला शनिवार पेठ असं नाव देण्यात आलं. पूर्वी मुरुजाबाद असं या पेठेला नाव होतं. पेशवेंच्या काळात या पेठेचं नामांतरण होऊन शनिवार पेठ असं झालं.
शुक्रवार पेठ
पुण्यातील सगळ्यात मोठी जागा म्हणून शुक्रवार पेठेला ओळखलं जायचं. तेव्हा या पेठेचं नाव विसापूर असं होतं. जिवाजीपं खासगिवले यांनी ही पेठ विकसीत केल्यानंतर १७३४ साली या पेठेचं नाव शुक्रवार पेठ असं नाव देण्यात आलं. सध्या इथं मंडई आहे. ही मंडई १८८५ साली बांधण्यात आली होती.
सदाशिव पेठे
पुण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली पेठ म्हणजे सदाशिव पेठ. या पेठेत ब्राह्मण वस्ती जास्त प्रमाणात आहे. पानिपतच्या लढाईत सादाशिवराव भाऊरावांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यामुळे या पेठेला सदाशिव पेठ असं नाव देण्यात आलं. पुण्यातील असंख्य जुने वाडे येथे आजही बघायला मिळतात. आणि इथे राहणाऱ्या लोकांनी स्वतःची एक नवीन शैली तयार केली आहे. ह्या शैलीमुळे मराठीमध्ये सदाशिव पेठी हे नवे विशेषण तयार झाले आहे. सारसबाग, विश्रामबाग वाडा, भारत इतिहास संशोधन मंडळ आदी विविध स्थळं इथं पाहायला मिळतात.
सेनादत्त पेठ
१९६२ साली पुण्यात झालेल्या महापुरामुळे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या भागात घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे ही सारी पेठं उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी येथील नागरिकांचं पूनर्वसन करण्यासाठी भारतीय लष्करानं वैकुंठ स्मशानाजवळच्या मोकळ्या जागे राहण्याची सोय करून दिली. भारतीय लष्कराने ही पेठ बांधून दिल्याने या पेठेला सेनादत्त पेठ असं नाव पडलं गेलं. याच पेठेला नवी पेठ असंही म्हणतात.
हणमंत पेठ
पुण्यातल्या भोर्डे आळीत मारुतीचं एक मंदिर आहे. या मारुतीला गंजीचा मारुती असंही म्हणतात. या देवळाच्या परिसाराला हणमंत पेठ म्हणून ओळखलं जां. १९१०साली ही पेठ वसवण्यात आली. पण कालांतराने ही पेठ नाना पेठेत विलीन झाली. नाना पेठेतच ही भोर्डे आळी आहे. म्हणून नानापेठेतली हणमंत पेठ असं या विभागाला म्हटलं जातं.
आणखी वाचा - पुण्यातील या जुन्या बेकरी अजूनही तितक्याच लोकप्रिय