धनगर समाजाचा दिवे घाटात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:30 AM2018-08-28T01:30:19+5:302018-08-28T01:31:31+5:30
आरक्षणाची मागणी : शासनाने म्हणणे न ऐकल्यास आंदोलन तीव्र करणार
वाघापूर : पुणे जिल्हा धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दिवे घाटामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शासनविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. मागण्यांसंदर्भात शासनाने गांभीर्याने विचार न केल्यास आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.
धनगर समाजाला सत्ता मिळाल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता मिळून तब्बल चार वर्षे झाली तरीही काहीच हालचाल होताना दिसत नाही. शासनाने आमचा अंत पाहू नये, आतापर्यंत या समाजाने शांततेच्या मागार्ने आंदोलने करून शासनापर्यंत आमचे गाºहाणे मांडले आहे. त्यानंतरही जर शासन आमच्या मागण्यांची दखल घेत नसेल तर शासनास भाग पाडू असा खणखणीत इशारा यावेळी पुणे जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष अशोक कोळेकर यांनी दिला आहे. धनगर समाजाच्या वतीने नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, पोलीस उपनिरीक्षक गोसावी, झेंडेवाडी गावच्या पोलीस पाटील सारिका झेंडे, आदि उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे जिल्हा युवक अध्यक्ष दादा कोकरे, पुरंदर तालुकाध्यक्ष स्वप्नील बरकडे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष खोमणे, दत्ता चोरमले, हवेली युवसेना प्रमुख हनुमंत कोळपे, बाबू कोकरे आदींनी मनोगत व्यक्त करताना शासनाचा निषेध केला.
शासनविरोधी घोषणा
दिवे घाट (ता. पुरंदर) येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आणि धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी समाजाच्या वतीने सासवड - पुणे रस्त्यावरील दिवे घाट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष दादा कोकरे, पुरंदर तालुकाध्यक्ष स्वप्नील बरकडे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष खोमणे, दत्ताभाऊ चोरमले, हवेली युवसेना प्रमुख हनुमंत कोळपे, बाबू कोकरे, सचिन बरकडे, सचिन कर्हे, सोमनाथ कर्हे त्याच प्रमाणे धनगर समाजाचे विविध प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.