भैरवी थाटात रंगणार ‘स्वरविलास’
By admin | Published: May 10, 2017 04:20 AM2017-05-10T04:20:46+5:302017-05-10T04:20:46+5:30
‘थाट’ या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वरविलास’ या संवाद आणि सांगीतिक मैफलीतून दिग्गज गायकांना ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘थाट’ या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वरविलास’ या संवाद आणि सांगीतिक मैफलीतून दिग्गज गायकांना ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना उपलब्ध झाली आहे. दि. १३ रोजी मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिरच्या एमईएस आॅडिटोरियम येथे सायंकाळी ५.३० वाजल्यापासून, तर १४ मे रोजी कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे सकाळी ९ वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला असल्याची माहिती संयोजक विलास जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर आणि पं. हेमंत पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
मैफलीची सुरुवात पं. हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यानंतर पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या पं. कलापिनी कोमकली यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाच्या मैफलीचा समारोप पं. शौनक अभिषेकी यांच्या संध्याकाळच्या रागाने होईल. १४ मे रोजी गायिका अनुराधा कुबेर व पं. संजीव अभ्यंकर यांच्या खास सकाळच्या रागांची मैफल आयोजित करण्यात आली आहे.
कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ पासून हा कार्यक्रम होईल. रवींद्र खरे कलाकारांशी संवाद साधतील. भरत कामत, प्रशांत पांडव (तबला) व सुयोग कुंडलकर, चैतन्य कुंटे (संवादिनी) कलाकारांना साथसंगत करतील.