'स्वाइन फ्लू वाढल्याने लशी मागविणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:33 AM2018-08-25T03:33:18+5:302018-08-25T03:33:37+5:30
पुणे : स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधक लशी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लशी उपलब्ध नसून केवळ स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांनाच टॅमी फ्लू या गोळ्या दिल्या जात आहेत. नागरिकांनी योग्य प्रकारे दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मागील महिनाभरात स्वाइन फ्लूची लागण झाल्याने ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच, संशयित रुग्णांचा आकडाही दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या शहरात स्वाइन फ्लूचे ३८ रुग्ण असून जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल ५ लाख ६५ हजार ६३९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ५ हजार ४१० संशयित रुग्णांना टॅमी फ्लू या गोळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. स्वाइन फ्लू झालेल्या १४ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांपैकी १० जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, आतापर्यंत २१ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या रुग्णांना लगेच टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जात आहेत. गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना स्वाइन फ्लूची लागण होऊ नये म्हणून लशी दिल्या जातात; परंतु सध्या त्या लशींचा साठा उपलब्ध नाही.
राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने (एनआयव्ही) ‘क्वॉड्रीव्हेलेंट’ ही नवीन लस वापरण्यास सांगतिले आहे. यापूर्वी दुसरी लस दिली जात होती. या लशी पालिकेने आधीही घेतल्या आहेत. आता नव्याने सुमारे ५ हजार लशी मागविण्यात येणार आहेत. त्या महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील. ही खूप महाग असली तरी मागविली जाणार आहे. या लशी पुरेशा नसल्या तरी नागरिकांनीही हे आजार टाळण्यासाठी दक्षता घेण्याची गरज आहे.
- डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग