शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 05:13 PM2024-04-20T17:13:58+5:302024-04-20T17:15:39+5:30

सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना अजित पवारांनी एक भविष्यवाणीही केली आहे.

Tears may come to Sharad Pawars eyes in the last meeting says ncp ajit pawar | शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले...

शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येऊ लागल्याने बारामतीतील राजकीय लढाई आणखीनच तीव्र झाली आहे. महाविकास आघाडीकडून मैदानात उतरलेल्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून निवडणूक लढवत असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान पवार कुटुंबातील सदस्य आमने-सामने येत आहेत. उमेदवार जरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी असल्या तरी खरा सामना हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात असल्याचं बोललं जात आहे. अशातच सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना अजित पवारांनी एक भविष्यवाणीही वर्तवली असून शेवटच्या सभेत ते भावुक होतील आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रूही येतील, असं शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी म्हटलं आहे.

कण्हेरी येथील सभेत उपस्थितांना आवाहन करताना अजित पवार म्हणाले की, "या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण महायुतीसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तुमच्या भविष्याचा, संसाराचा विचार करून महायुतीच्याच उमेदवाराला निवडून द्या. निवडणुकीत तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटच्या सभेत तर त्यांच्या डोळ्यांत अश्रूही येऊ शकतात. मात्र तुम्ही भावनिक होऊ नका," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजित पवारांकडून दमदाटीचा आरोप

बारामतीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने करत आहेत. मात्र आजच्या सभेत अजित पवारांकडून या आरोपाला पलटवार करण्यात आला आहे. "मतदानासाठी माझ्याकडून धमकावले जात असल्याचे काहीजण बोलतात. मात्र, आपण कोणाला मतासाठी धमकावत बसलो असतो तर लोकांना एवढ्या मतांनी निवडून दिले असते का? शारदानगर परिसरात काय चाललेय बघा, एका शिक्षिकेच्या मुलाने घड्याळाचा  प्रचार करत असल्याचे कारण सांगत त्या शारदानगरच्या शिक्षिकेला कामावरुन कमी करण्यात आलं," असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

Web Title: Tears may come to Sharad Pawars eyes in the last meeting says ncp ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.