... तर वाहनांना जॅमर
By admin | Published: July 14, 2016 12:31 AM2016-07-14T00:31:20+5:302016-07-14T00:31:20+5:30
येथील महापालिका भवनात वाहनतळाची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिक मुख्य मार्गावरच वाहने लावतात. महापालिकेसमोर वाहन उभे केल्यास जॅमर लावला जाऊ शकतो.
पिंपरी : येथील महापालिका भवनात वाहनतळाची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिक मुख्य मार्गावरच वाहने लावतात. महापालिकेसमोर वाहन उभे केल्यास जॅमर लावला जाऊ शकतो. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने उभी करायची कोठे याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय कार्यालयात वाहतळाची सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास होतो. पैसा आणि वेळेचा अपव्यय होतो. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. महापालिकेसह शहरातील महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी, तहसीलदार अशा विविध शासकीय कार्यालयांची पाहणी केली होती.
बेस्ट सिटीतील महापालिकेचे वाहनतळ हे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांना अपुरे पडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुणे-मुंबई रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. तसेच महापालिकेतून बाहेर पडण्याच्या मार्गावरही वाहने उभी केली जातात. याबाबतच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, महापालिकेकडे असणारी वाहनतळाची सुविधा अपुरी असल्याची कबुलीही महापालिका अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच विस्तारित इमारतीत याबाबत विचार केला जाईल, असे महापालिकेचे म्हणणे होते. दरम्यान, महापालिका भवनासमोरील रस्त्यावर दररोज शंभर ते दीडशे वाहने धोकादायकपणे उभ्या करीत असल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले होते. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे, याबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रश्नाची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली. भवनासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंस नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली.(प्रतिनिधी)