...तर सरकारने राजीनामा द्यावा - डॉ. श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:10 AM2018-02-02T06:10:52+5:302018-02-02T06:11:19+5:30

‘मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते,’ असा सवाल करत ‘मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे.

 ... then let the government quit - Dr. Shripal Sabnis | ...तर सरकारने राजीनामा द्यावा - डॉ. श्रीपाल सबनीस

...तर सरकारने राजीनामा द्यावा - डॉ. श्रीपाल सबनीस

Next

पुणे : ‘मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते,’ असा सवाल करत ‘मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे. ५६ इंची छातीसमोर उभे राहून ‘अभिजात’चा प्रश्न लावून धरण्याची हिमंत नसेल तर फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा,’ अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सरकारच्या उदासीनतेचा खरपूस समाचार घेतला.
साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या वतीने नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार व चित्रकार सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ९१ संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, मराठी भाषेचे अभ्यासक प्रा. हरी नरके, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, चित्रकार सुरेश लोटलीकर, भारत देसडला, सचिन ईटकर, श्याम देशपांडे, बारामती अ‍ॅग्रोचे उपाध्यक्ष रोहित पवार, संयोजक कैलास भिंगारे यांच्यासह आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशा राजकारण्यांना मराठीचा पुळका असेल तर अभिजातच्या दर्जाबाबत ते गप्प का? शिक्षणमंत्री विनोद तावडे राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेताहेत, हा अतिशय क्रूर विनोद आहे. सरकारला कोंडीत पकडून संबंधितांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. लोकचळवळ उभारून मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी लढा दिला पाहिजे. मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे.’
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘अभिजात भाषेचा लढा संयमाने आणि निग्रहाने लढायचा आहे. देशात भाषिक राजकारण सुरू आहे. इंग्रजी शाळा वाढत आहेत आणि मराठी शाळा ओस पडत आहेत. मराठी भाषा चिंध्या पांघरुन जीवनदान मागत आहे. अभिजात दर्जा मिळाल्यास मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ, संशोधन केंद्र उभारणे शक्य होईल. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत रेटा वाढवला पाहिजे. गावोगावी ग्रंथालयांची उभारणी केली पाहिजे. मराठी प्रशिक्षणाचा कायदा अस्तित्वात आणला पाहिजे.’
कैलास भिंगारे यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार आर. के लक्ष्मण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व इतर नामवंत व्यंग्यचित्रकारांच्या गाजलेली व्यंग्यचित्रेही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन २ फ्रेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहील.

मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या निमित्ताने सारस्वतांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून भाषेच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन आपले ध्येय साध्य होणे, आवश्यक आहे. राजकारण्यांच्या अजेंड्यावर भाषा, साहित्य, संस्कृतीला प्राधान्य दिले जात नाही. त्याचप्रमाणे, विचारवंतांची कृतिशून्यताही समाजासाठी घातक असते. त्यामुळे अभिजातच्या प्रश्नासाठी कृतिशील होण्याची गरज आहे. - प्रा. मिलिंद जोशी

मराठीचे राजकारण नव्हे, तर सर्वांनी मिळून मराठीसाठी राजकारण केले पाहिजे. अभिजात दर्जामुळे मराठी शाळा, मराठी शिक्षणाला प्रतिष्ठा येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निधी उपलब्ध होईल. मराठी ज्ञानभाषा आहेच; तिला रोजगारक्षम करण्यासाठी अभिजात दर्जा मिळणे गरजेचे आहे. - प्रा. हरी नरके

Web Title:  ... then let the government quit - Dr. Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.