पालिकेच्या शाळेत नव्या प्रवेशांची नोंदच नाही
By admin | Published: November 24, 2015 01:02 AM2015-11-24T01:02:11+5:302015-11-24T01:02:11+5:30
शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सहा महिने उलटून गेले तरी, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बहुतांश शाळांनी नोंदवहीत नावेच लिहिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या पाहणीतच उघडकीस आले आहे
पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सहा महिने उलटून गेले तरी, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बहुतांश शाळांनी नोंदवहीत नावेच लिहिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या पाहणीतच उघडकीस आले आहे. त्यामुळे अद्यापही या नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश अधिकृत झाले नसल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी नव्याने प्रवेशित झाला, तर शाळेकडून त्यांची नोंदवहीत नाव घालून त्याला अधिकृत नोंदणी क्रमांक देण्याची पद्धत आहे. विद्यार्थ्याचा प्रवेश झाल्यापासून १ ते २ दिवसांत होणे अपेक्षित आहे. तसा नियमही आहे. या नोंदवहीत जर विद्यार्थ्याचे नाव नोंदविले तरच त्याचा प्रवेश झाला, असे ग्राह्य धरण्यात येते. मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडूनच करण्यात आलेल्या पाहणीत हे सत्य उघड झाले आहे. बहुतांशी शाळांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद सहा महिने उलटून गेले तरीही केलेली नाही. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार होऊनही पालिका अधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत याबाबत कोणत्याही मुख्याध्यापक किंवा शिक्षकावर कारवाई झालेली नाही.
याबाबत शिक्षण
मंडळातील सूत्रांनी सांगितले की, बरेच विद्यार्थी हे मधूनच
शाळा सोडून जातात. गळती
होते. नोंद झाल्यानंतर जर
काही विद्यार्थी शाळा सोडून गेले
तर त्यानंतर शिक्षकांना
अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यामुळे बहुतांशी शिक्षक हे नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची अर्धे वर्ष होईपर्यंत नोंदच करत नाहीत.
नवीन विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर जुलैमध्येच शिक्षण मंडळाने नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर पर्यवेक्षकांकडून या नोंदी झाल्या आहेत की नाही याची तपासणीही करण्यात येते. यासंदर्भात पुन्हा एकदा सूचना देण्यात येतील व जे मुख्याध्यापक व शिक्षक या नोंदी करणार नाहीत, त्यांच्यावर तसेच संबंधित पर्यवेक्षकावरही कारवाई करण्यात येईल.
- बबन दहिफळे, शिक्षणप्रमुख,
पुणे महापालिका शिक्षण मंडळ