मौजमजेसाठी चोरी करणारा गजाआड
By Admin | Published: March 26, 2017 02:03 AM2017-03-26T02:03:32+5:302017-03-26T02:03:32+5:30
कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी आॅफिस बॉयला अटक करण्यात
पुणे : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली तब्बल सहा लाखांची रोकड लंपास केल्याप्रकरणी आॅफिस बॉयला अटक करण्यात आली आहे. चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. मौजमजेसाठी त्याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यासाठी बनावट चावीचा वापर करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
गोपाळ मच्छिंद्र धनगर (वय २६, सध्या रा. पाषाण. मूळ रा. मंगळूर, ता. चोपडा, जि. जळगाव) असे अटक केलेल्याआरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल रवींद्र बेहरे (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण येथील चेतस कंट्रोल सिस्टीम्स या कंपनीमध्ये बेहरे हे अकाऊंट असिस्टंट म्हणून काम करतात. आरोपी धनगर हा मागील सात वर्षांपासून या कार्यालयात आॅफिस बॉय म्हणून काम करीत होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार करायचे असल्याने बेहरे यांनी धनगरला १८ मार्च रोजी बँक आॅफ इंडियाचा धनादेश देऊन पाच लाख रुपये काढून आणण्यास सांगितले होते. बँकेतून काढलेली ही रक्कम आणि आधीचे दोन लाख असे एकूण सात लाख रुपये बेहरे यांनी शिपाई प्रल्हाद साळुंखेकडे दिले होते. त्यांनी हे पैसे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयातील कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवले होते. या ड्रॉव्हरला कुलूपही लावण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे ड्रॉव्हरमधून काढण्यासाठी गेलेल्या साळुंखे यांना एकच लाख रुपये दिसले. त्यांनी याची माहिती बेहरे यांना दिली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)