परिवहन कार्यालय की ‘भंगार डेपो’

By admin | Published: June 17, 2016 05:20 AM2016-06-17T05:20:33+5:302016-06-17T05:20:33+5:30

शहरातील वाहनांच्या संख्येने तब्बल ३१ लाखांचा आकडा ओलांडलेला. त्यामुळे वाहनांच्या परवान्यांपासून ते शिकाऊ परवान्यापर्यंत या ना त्या कामानिमित्ताने दररोज शेकडो पुणेकर संगमवाडी

Transport Office's 'Scatter Depot' | परिवहन कार्यालय की ‘भंगार डेपो’

परिवहन कार्यालय की ‘भंगार डेपो’

Next

पुणे : शहरातील वाहनांच्या संख्येने तब्बल ३१ लाखांचा आकडा ओलांडलेला. त्यामुळे वाहनांच्या परवान्यांपासून ते शिकाऊ परवान्यापर्यंत या ना त्या कामानिमित्ताने दररोज शेकडो पुणेकर संगमवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात ये-जा करतात. मात्र, या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये आरटीओने कारवाई करून जप्त केलेल्या वाहनांचा खच पडला असल्याने या ठिकाणी कामासाठी आलेल्या नागरिकांची वाहने मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
या ठिकाणी पार्किंगच नसल्याने अनेकांना स्वत:ची वाहने या कार्यालयापासून सुमारे १०० ते २०० मीटर लांब पार्क करूनच या कार्यालयाची पायरी चढावी लागत असून, अनेकदा रस्त्यावर लावलेल्या गाड्या पोलिसांकडून उचलल्या जात आहेत. त्यामुळे या कार्यालयात जाणे म्हणजे दुहेरी मनस्ताप असल्याची भावना पुणेकर व्यक्त करतात.
संगमवाडी येथील आरटीओ कार्यालय सुमारे तीन एकर परिसरात विस्तारलेले आहे. त्यात प्रामुख्याने मुख्य प्रशासकीय इमारतीसह, शिकाऊ परवाना विभागाचे चाचणी केंद्र आहे, तर उर्वरित सर्व जागा रिकामी आहे. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनांची नोंदणी, वाहन परवाना, वाहन शुल्क, वाहन हस्तांतरण अशा एक ना अनेक कामांसाठी दररोज शेकडो पुणेकर सकाळी दहा ते दुपारी ३ पर्यंत येतात. त्यांच्या वाहनांची संख्या जवळपास तीन ते चार हजारांच्या आसपास आहे. त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करून देणे हे आरटीओ विभागाचे काम आहे. मात्र, या कार्यालयाच्या परिसरात असलेली रिकामी जागा कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या वाहनांनी व्यापली असल्याने या कार्यालयात दुचाकी पार्किंगसाठी जागाच नसल्याचे वास्तव आहे.
त्यापेक्षाही वाईट अवस्था चारचाकी घेऊन येणाऱ्या व्यक्तींची आहेत. नागरिकांना वाहने कार्यालयाच्या आसपासच्या रस्त्यावर लावण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहात नसल्याचे दिसून येते.

मोफत पार्किंग नाहीच...
प्रत्यक्षात वाहनांसंबंधीचे कोणतेही काम करताना, नियमानुसार, काही काही स्वरूपात नागरिकांना शुल्क भरावेच लागते. त्यामुळे एखादे वाहन घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती किमान पाच हजार रुपयांचा कर भरतेच. त्यामुळे अशा वेळी या कार्यालयात असलेली पार्किंग मोफत असावे अशी सर्वसामान्यांची माफक अपेक्षा असते.
मात्र, या कार्यालयातील सर्व जागा पे अँड पार्किंगसाठी ठेकेदाराकडे देण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सोडण्यासाठी आत मध्ये गेले तरी बाहेर येण्यासाठी पार्किंग शुल्क मोजावेच लागते.
आतमध्ये गाडीचे नुकसान झाले अथवा ती चोरीला गेली तर त्याची जबाबदारी कोणी घेत नाही. मात्र, पार्किंगची वसुली नियमितपणे सुरूच असते.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या कार्यालयात मोठया प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. त्यातच अस्ताव्यस्तपणे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे तसेच या ठिकाणी येत असलेल्या वाहनांची तपासणी होत नसल्याने या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्यक्षात या कार्यालयात आलेल्या गाड्यांची तपासणी करणे, त्यांचे नोंदणी क्रमांक ठेवणे अशा कोणत्याही उपाय योजना प्रशासनाकडून केलेल्या दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेक जण आतमध्ये गाडी लावून संपूर्ण शहर फिरूण येऊन पुन्हा गाडी घेऊन जाताना दिसतात. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याने या कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांची वाहने रस्त्यावर
या ठिकाणी येणारे नागरिक वाहनांसंबधी कामांसाठी येत असले तरी, त्यांना स्वत:चे वाहन लावण्यासाठी या ठिकाणी जागा नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव मंगळवारपेठ, संगमवाडी घाट, कैलास स्मशानभूमी येथील मैदान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर जागा मिळेल तिथे दुचाकी पार्क करावी लागते. त्यानंतर चालत जाऊन कार्यालयातील काम उरकून पुन्हा गाडी घेण्यासाठी यावे लागले. अशा वेळी अनेकदा रस्त्यावर लावलेले वाहन नो पार्किंगमध्ये असल्याने त्याचा दंडही पुन्हा नागरिकांनाच भरावा लागतो. या शिवाय पोलीस ठाण्यांची हद्द माहीत नसल्याने नेमकी कोणत्या पोलिसांनी गाडी उचलून नेली याचा शोध घेता घेता नागरिकांची पुरती दमछाकही होते.

पार्किंगचा गैरवापर
या कार्यालयातील पार्किंगचाही मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसतो. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पुरेसे पार्किंग नसल्याने अनेकदा रेल्वे प्रवासी या पार्किंगमध्ये आपली वाहने दहा-दहा दिवस लावतात. त्यानंतर परत घेऊन एका तासाचे शुल्क भरून आपली वाहने घेऊन जातात. त्यामुळे काही वेळाच्या कालावधीसाठी आलेल्या वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे हा गैरवापर थांबविण्याची मागणीही होत आहे.


कार्यालयात होणारी गर्दी लक्षात घेता, सध्याची जागा कमी पडत आहे. त्यामुळे सध्या कारवाई करून ठेवलेल्या गाड्यांचा लवकरच लिलाव केला जाणार असून, या परिसरातील रिकाम्या जागेचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यानंतर कार्यालयाच्या खालील जागा दुचाकींसाठी तर नवीन जागा चारचाकींसाठी असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्किंगची जागाही उपलब्ध होईल.
- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

भंगार गाड्यांचा खच
या कार्यालयाकडून रिक्षा, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी जागेची आखणी करून ठेवलेली आहे. मात्र, त्या ठिकाणी आरटीओने कारवाई करून आणलेल्या गाड्यांचा खच पडलेला आहे.
यातील अनेक गाड्या गंजलेल्या असून, वर्षानुवर्षे त्या एकाच ठिकाणी जागा अडवून उभ्या आहेत. त्यामुळे त्या जागी इतर वाहनांसाठी जागा उपलब्ध होताना दिसत नाही.
ज्या ठिकाणी पार्किंगची जागा आखून दिली आहे, त्या ठिकाणीही वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी गाड्या या ठिकाणी उभ्या असतात.

Web Title: Transport Office's 'Scatter Depot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.