वाहतूक नियोजन खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:29 AM2017-07-21T04:29:53+5:302017-07-21T04:29:53+5:30
रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसामुळे पडलेली झाडे आणि अचानक बंद पडलेल्या बसेस या कारणांमुळे शहरातील विविध रस्त्यांवर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्यांवर पडलेले खड्डे, पावसामुळे पडलेली झाडे आणि अचानक बंद पडलेल्या बसेस या कारणांमुळे शहरातील विविध रस्त्यांवर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अधूनमधून बरसणारा पाऊस, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा आणि लांबच लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा याचा फटका वाहनचालकांना बसला.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने चारचाकी गाड्या अधिक प्रमाणात रस्त्यावर उतरल्या आहेत. यातच दर पावसाळ्यात पूर्वनियोजनाचा गोषवारा करूनही रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने वाहनचालकांच्या त्रासात दिवसागणिक भरच पडत आहे. या परिस्थितीमध्ये गुरुवारचा दिवस पुणेकरांची खऱ्या अर्थाने परीक्षा पाहणारा ठरला. शिवाजीनगर भागातील संत ज्ञानेश्वर पादुका चौक ते जंगली महाराज दरम्यान झाड पडल्याने त्या परिसरातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहनचालक एकाच ठिकाणी थांबून होते. प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्त्यावरील वाहतूककोंडीचा सर्व ताण विधी महाविद्यालय रस्त्यावर आला होता. त्यामुळे वाहचालक खूप काळ अडकून पडत होते.
कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. वानवडी भागात बस बंद पडल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. पावसाच्या सरींमुळे वाहतूक अधिकच मंदावली होती. वारजे-कात्रज सर्व्हिस लेन, पाषाण, चतु:शृंगी तसेच दत्तवाडी, म्हात्रे पूल, स्वारगेट, कोंढवा, केशवनगर चौक, गोळीबार मैदान अशा विविध भागांमध्ये वाहतूककोंडी झाली होती.
पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालविण्याची वेळ येत
होती. सिग्नल यंत्रणाही काही भागांत बंद पडल्याने वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करताना पोलिसांची चांगलीच दमछाक पाहायला
मिळत होती. एकंदरच वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचे दिसून आले.