भव्य चित्रातून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 03:23 PM2019-01-22T15:23:49+5:302019-01-22T15:25:51+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील नारायण पेठेत त्यांचे भव्य चित्र साकारण्यात आले आहे.
पुणे : शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील नारायण पेठेत त्यांचे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. युवासेनेचे शहराध्यक्ष निरंजन दाभेकर यांच्या कल्पनेतून हे चित्र साकारण्यात आले आहे. प्रसिद्ध कलाकार निलेश खराटे यांनी हे चित्र साकारले असून सध्या हे चित्र पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम यातून दाभेकर यांनी इमारतीच्या भिंतीवर बाळासाहेबांचे चित्र साकारण्याचा निर्णय घेतला. नारायण पेठेतील एका इमारतीच्या भिंतीवर 60 बाय 30 इतक्या आकाराचे हे चित्र असून भारतात पहिल्यांदाच बाळासाहेबांचे इतके भव्य चित्र साकारण्यात येत असल्याचा दावा दाभेकर यांनी केला आहे. गेल्या दाेन दिवसांपासून या चित्राचे काम सुरु असून बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. बाळासाहेबांची गंभीर, कणखर भावमुद्र या चित्राच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.
या चित्राबाबत दाभेकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अनाेखी मानवंदना देण्यासाठी हे चित्र साकारण्यात आले आहे. भारतात प्रथमच बाळासाहेबांचे 60 बाय 30 इतक्या आकाराचे वाॅल पेंटिंग साकारण्यात आले आहे. बाळासाहेबांचे जन्मस्थान येथून जवळच सदाशिव पेठेत आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्र साकारण्याचा आम्ही निर्णय घेतला.
या चित्राचे आर्टिस्ट निलेश खराडे म्हणाले, बाळासाहेब स्वतः उत्कृष्ट चित्रकार हाेते. त्यांचे भव्य चित्र काढण्याचा माझा विचार हाेता. गेल्या दाेन दिवसांपासून आम्ही हे चित्र साकारत आहाेत. या चित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांची किर्ती जगात पाेहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.