भाजपाचा चुकीची प्रथा पाडण्याचा प्रयत्न - चेतन तुपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 07:07 AM2017-12-05T07:07:52+5:302017-12-05T07:08:03+5:30
महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. महापालिकेचा कार्यक्रम या सर्वांचा कार्यक्रम असतो. मात्र महापालिकेच्या कार्यक्रमांना फक्त सत्ताधाºयांना निमंत्रण देऊन भारतीय जनता पार्टी चुकीचा पायंडा
पुणे : महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. महापालिकेचा कार्यक्रम या सर्वांचा कार्यक्रम असतो. मात्र महापालिकेच्या कार्यक्रमांना फक्त सत्ताधाºयांना निमंत्रण देऊन भारतीय जनता पार्टी चुकीचा पायंडा पाडत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. पालकमंत्री गिरीश बापट त्यांना साथ देत आहेत ही खेदजनक गोष्ट आहे असे, ते म्हणाले.
महापालिकेचे दोन कार्यक्रम महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात सोमवारी झाले. माता बालकांसाठी विशेष दक्षता कक्ष सुरू करणे व महापालिकेच्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीच्या मराठीतील अनुवादाचे प्रकाशन असे दोन कार्यक्रम पालकमंत्री बापट यांच्या उपस्थितीत झाले. या दोन्ही कार्यक्रमांना विरोधकांपैकी कोणीही उपस्थित नव्हते.
याबाबत तुपे यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी महापालिकेत कधीही असा प्रकार झाला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसे असे चार विरोधी पक्ष महापालिकेत आहेत. त्यांच्यापैकी एकाही पक्षाला सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या कार्यक्रमाला बोलावले नव्हते. विरोधी पक्षनेता म्हणून आपण स्वत: महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यांच्यासमवेत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीला होते, मात्र त्यांच्यापैकीही कोणी कार्यक्रमांचे निमंत्रण दिले नाही.
पालकमंत्री हे सर्व जिल्ह्याचे असतात, त्यांनी याबाबत आपल्या पदाधिकाºयांना विचारायला हवे होते. तसे त्यांनी केलेले दिसत नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारणी व्यक्तीने याप्रकारे वागावे याची खंत वाटते आहे असे तुपे म्हणाले.