परराज्यातील बेकायदा मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाची घोरपडीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:55 AM2017-12-29T11:55:39+5:302017-12-29T12:00:03+5:30
हरियाणा आणि गोव्यामधून आणलेले साडेतीन लाख रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये छापे टाकून ही कारवाई करण्यात आली.
पुणे : हरियाणा आणि गोव्यामधून आणलेले साडेतीन लाख रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. सैन्यासाठी राखीव असलेले हे मद्य बेकायदेशीरपणाने पुण्यामध्ये आणण्यात आले होते. घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये छापे टाकून ही कारवाई करण्यात आली.
विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांना घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये बेकायदा मद्य आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, घोरपडी गावातील भारत फोर्ज कंपनीजवळ राहणाऱ्या मणिकंदन नायर याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या घरामध्ये हरियाणा व गोव्यामधून आणलेली २ लाख १३ हजारांचे मद्य मिळून आले. नायरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दापोडी येथील काटे वस्तीमधील शंभूराजे चिकन अँड एग्ज सेंटरवर छापा टाकण्यात आला. या दुकानामध्ये १ लाख ४४ हजारांचे मद्य मिळून आले.
हरियाणा राज्य बनावटीच्या १२२ बाटल्या तर गोव्यातील १३७ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मोहन वर्दे, उपअधीक्षक सुनील फुलपगार आणि प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक वसंत कौसडीकर, उपनिरीक्षक राजेंद्र झोळ, कैलास वाळुंजकर, महेश बनसोडे, सुनील कुदळे, केशव वामने यांनी ही कामगिरी केली.